सोन्यासारखी माणसे मिळाली

By admin | Published: February 17, 2016 01:36 AM2016-02-17T01:36:16+5:302016-02-17T01:36:16+5:30

साहित्य संमेलनात खर्च किती झाला, असे विचारले जात असले तरी यापेक्षा गेल्या ३५ वर्षांत शैक्षणिक संस्थेमध्ये काम करूनही जी संपत्ती मिळाली नाही, तितके प्रेम आणि सोन्यासारखी माणसे या संमेलनाने दिली

They found gold like gold | सोन्यासारखी माणसे मिळाली

सोन्यासारखी माणसे मिळाली

Next

पुणे : साहित्य संमेलनात खर्च किती झाला, असे विचारले जात असले तरी यापेक्षा गेल्या ३५ वर्षांत शैक्षणिक संस्थेमध्ये काम करूनही जी संपत्ती मिळाली नाही, तितके प्रेम आणि सोन्यासारखी माणसे या संमेलनाने दिली. हा जगन्नाथाचा रथ एकट्याने न ओढता त्याला अनेकांचे हात मिळाले, चांगली माणसे मिळाली की हस्तक्षेप करू नये, नाही तर आपणच नाशाला जबाबदार ठरतो. जे चांगलं आहे ते आवर्जून घ्यावे, याच सकारात्मक ऊर्जेतून काम करीत राहिलो असल्याची भावना ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा पुणेच्या वतीने डॉ. पी. डी. पाटील मानपत्र प्रदान सोहळ्याचे मंगळवारी आयोजन केले होते. संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस आणि माजी संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते डॉ. पाटील यांचा सत्कार करण्यात आला. त्या वेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.
भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शिवाजीराव कदम, खासदार वंदना चव्हाण, महावितरणचे मुख्य अभियंता रामराव मुंडे, अरुण शेवते, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, विजय कुवळेकर, भारत देसडला आणि पी. डी. पाटील यांच्या पत्नी भाग्यश्री पाटील उपस्थित होते.
हा सन्मान सोहळा माझ्यासाठी वाढदिवसाची सरप्राईज भेट असल्याचे सांगून डॉ. पाटील म्हणाले, ‘‘हे संमेलन इतके मोठे होईल, असा विचार कधीच केला नव्हता. भक्तिभाव आणि विश्वास यांच्या जोरावर पुढे जात गेलो. परमेश्वराच्या मनात असेल तसंच घडेल, याचे उत्तम उदाहरण म्हणजे हे संमेलन आहे. स्वागताध्यक्ष म्हणून नव्हे तर मिळालेली माणसे आणि प्रेम यामुळे संमेलन यशस्वी करू शकलो. साहित्यिकांच्या गाठीभेटीतून आयुष्य बदलले. या संमेलनातून हेदेखील उमजले, की संमेलनाला आषाढी एकादशीसारखे साहित्याचे वारकरी जातात. हे संमेलन दरवर्षी झालंच पाहिजे. हे संमेलन जयपूरपेक्षाही मोठे आहे, अशी गुलजार, चेतन भगत यांच्याकडून मिळालेली दाद खूप काही सांगून गेली आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये आपला सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमामुळे या कार्यक्रमाला येण्यास काहीसा विलंब लागला, अशी दिलगिरी व्यक्त करीत डॉ. पी. डी. पाटील यांनी ‘साहित्य संमेलनामुळे ‘माफी’ मागण्याची सवय लागली असल्याची मार्मिक टिप्पणीही केली.
डॉ. शिवाजीराव कदम म्हणाले, ‘‘पी. डी. पाटील यांच्याशी २५ वर्षांचा ॠणानुबंध आहे. अजातशत्रू म्हणून आमच्याकडे पाहिले जात असले तरी प्रत्येक संस्था ही आपल्या विचार आणि तत्त्वांवर उभी राहते. भारती विद्यापीठानेही १९९८ मध्ये कोथरूड भागात ग्रामीण संमेलन भरविले होते. साहित्य महामंडळाने संधी दिली तर आम्हीही संमेलन आयोजनाचा निश्चितपणे विचार करू.’’
निवेदक सुधीर गाडगीळ यांनी व्यासपीठावरील मान्यवरांना प्रश्नातून बोलते करून काहीशा कोपरखळ्या मारल्या. त्याला सर्वांनी तितकीच उत्स्फूर्त दाद दिली. हा प्रश्नोत्तराच्या तासाने उपस्थितांची हसून पुरे वाट झाली. प्रसिद्ध कवी उद्धव कानडे यांच्या ‘आम्ही घामाचे धनी’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
(प्रतिनिधी)

Web Title: They found gold like gold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.