त्या दाेघांनी अवघ्या 310 रुपयांमध्ये बांधली रेशीमगाठ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2019 01:16 PM2019-06-11T13:16:25+5:302019-06-11T13:22:10+5:30
अवघ्या 310 रुपयांमध्ये नाेंदणी पद्धतीने विवाह करुन पुण्यातील जाेडप्याने एक नवीन आदर्श समाजासमाेर उभा केला आहे.
पुणे : लग्न म्हंटलं की लाखाे रुपयांचा खर्च करण्याची पद्धत पाहायला मिळते. उंची डेकाेरेशन, विविध पदार्थांची मेजवाणी, मानपान, उंची कपडे असा सगळा थाटमाट लग्नांमध्ये पाहायला मिळताे. परंतु पुण्यातील एका जाेडप्याने अवघ्या 310 रुपयांमध्ये आयुष्यभराची रेशीमगाठ बांधली आहे. अहिरे गावातील विशाल चाैधरी आणि खडकवासला गावातील भाग्यश्री मते यांनी नाेंदणी पद्धतीने विवाह केला आहे. त्यांच्या विवाहाला केवळ 310 रुपये इतकाच खर्च आला. लग्नासाठी हाेणारा वायफळ खर्च टाळून ताे भविष्यासाठी, शिक्षणासाठी वापरण्यात यावा असा संदेश या निमित्ताने दाेघांनी दिला आहे.
महात्मा फुले यांनी त्यांच्या शेतकऱ्याचा असूड या पुस्तकामध्ये लग्न कार्यात हाेणाऱ्या अनाठायी खर्चामुळे येणारे दारिद्र, हाेणारा वायफळ खर्च याबाबत लिखान केले आहे. महात्मा फुलेंचा आदर्श घेत पुण्यातील जाेडप्याने साध्या पद्धतीने विवाह करण्याचा निर्णय घेतला. महात्मा फुलेंचे पुस्तक वाचताना लग्नावर हाेणार खर्च टाळण्याचा निर्णय विशालने घेतला. याबाबत त्याने स्वतःच्या घरी तसेच मुलीच्या घरी याबाबत सांगितले. सुरुवातीला दाेघांना दाेन्हीकडच्या नातेवाईकांच्या राेषाला सामाेरे जावे लागले. नाेंदणी पद्धतीने लग्न केल्यानंतर आळंदीला जाऊन साध्या पद्धतीने लग्न करण्याबाबतही नातेवाईकांनी गळ घातली. परंतु ते ही मान्य न करता केवळ नाेंदणी पद्धतीने लग्न करण्याचा निर्णय दाेघांनी घेतला. साेमवारी दाेघांनी विवाह केला.
विशाल आणि भाग्यश्री हे मराठा समाजातील आहे. दाेघेही उच्चशिक्षित आहेत. लग्नावर हाेणारा वारेमाप खर्च त्यांना मान्य नाही. गेल्या अनेक वर्षांपासून ते सामाजिक कार्य देखील करत आहेत. साध्या पद्धतीने लग्न करुन त्यांना समाजात एक आदर्श घालून द्यायचा हाेता. केवळ लग्नसाठी जमीन विकून कर्जबाजारी झालेल्या लाेकांची अनेक उदाहरणे समाजात आहेत. त्यामुळे महात्मा फुलेंनी ज्या पद्धतीने साध्या पद्धतीने लग्न करण्याचा विचार दिला, त्याला अनुसरुन या जाेडप्याने एक नवीन पायंडा समाजात घातला आहे.