...त्यांना मिळाला मानसिक आधार
By admin | Published: July 30, 2016 05:01 AM2016-07-30T05:01:32+5:302016-07-30T05:01:32+5:30
एका रात्रीत होत्याचे नव्हते झालेले... नातेवाईक, रोज ज्यांच्यासोबत शाळेत जातो ते जिवाभावाचे मित्र आणि अगदी शेजारपाजारही सगळे त्या रात्रीत धरतीने आपल्या पोटात घेतलेले...
- सायली जोशी-पटवर्धन, पुणे
एका रात्रीत होत्याचे नव्हते झालेले... नातेवाईक, रोज ज्यांच्यासोबत शाळेत जातो ते जिवाभावाचे मित्र आणि अगदी शेजारपाजारही सगळे त्या रात्रीत धरतीने आपल्या पोटात घेतलेले... मदतीचे अनेक हात पुढे आले... मात्र, या धक्क्यातून मनाला सावरायचे कसे, हा प्रश्न या चिमुरड्यांपुढे कायम होता... भोई प्रतिष्ठानने त्यासाठी पुढाकार घेतला असून या विद्यार्थ्यांना मानसिक आणि भावनिक आधार देण्याचे काम संस्था मागील दोन वर्षापासून करत आहे. डॉ. मिलींद भोई म्हणाले, आपले जीवलग गमावलेल्या या लोकांना मानसिकरित्या सावरण्यासाठी मदत करणे महत्त्वाचे वाटले. त्यासाठीच प्रतिष्ठानने चला माळीण पुन्हा उभारुया हा प्रकल्प चालू केला.
यामध्ये विद्यार्थ्यांनी घडलेल्या घटनेचे दु:ख विसरुन पुढे जावे हा मूळ उद्देश होता. यामध्ये मानसोपचारतज्ज्ञ आणि मान्यवर कलाकारांना समाविष्ट करुन विविध उपक्रम राबविण्यात आले. विक्रम गोखले, अलका कुबल या कलाकारांनी प्रत्यक्ष माळीणमध्ये जाऊन या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या विद्यार्थ्यांचे मानिसक स्वास्थ्य चांगले रहावे यासाठी त्यांना गणपती पहाण्यासाठी पुण्यात आणण्यात आले तर राखीपौर्णिमेला त्यांना राख्या आणि शुभेच्छापत्र पाठविण्यात आली. या मुलांनी याची देही याची डोळा पाहीलेले हे दु:ख विसरुन त्यातून लवकरात लवकर बाहेर पडावे हा यामागील मुख्य उद्देश असल्याचेही डॉ. भोई म्हणाले. याबरोबरच या विद्यार्थ्यांना १० वी नंतर पुण्यात येऊन शिक्षण घेण्याची इच्छा असल्यास त्यांचे पालकत्व भोई प्रतिष्ठान घेणार असून पुण्यातील अनेक नामवंत संस्थांनीही यासाठी पुढाकार घेतला आहे. माळीणमधील शाळेतील शिक्षक मच्छींद्र झांजरे व तुकाराम लेंबे यांनीही कुटुुंबियांना या दुर्घटनेत गमावले आहे. या विद्यार्थ्यांकडे पाहून हे दोन्हीही शिक्षक विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्याला आपला विद्यार्थी खंबीरपणे कसा सामोरा जाईल याचाच प्रयत्न ते करत आहेत. याबरोबरच रेणू गावसकर, समुपदेशक निरुपमा दिवेकर, डॉ. नितीन बोरा यांसारख्या समाजातील अनेक व्यक्तींनीही या उपक्रमासाठी मदतीचा हात पुढे केल्याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.
मळभ झाले दूर
पुण्याच्या खगोलशास्त्र विषयात महत्त्वपूर्ण काम करणाऱ्या आयुका या संस्थेतही विद्यार्थ्यांना नेण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्याशी खगोलशास्त्रातील गोष्टी जाणून घेत मनमोकळा संवाद साधला. या भेटीनंतर आपल्या गावी परतलेल्या एका विद्यार्थ्याने प्रतिष्ठानला एक पत्र लिहिले आहे. या उपक्रमामुळे आपल्या आयुष्यात आलेले मळभ कशाप्रकारे दूर झाले त्याचे वर्णन विद्यार्थ्याने अतिशय नेमक्या शब्दात मांडले आहे.