शाब्बास पोरांनो..! दिवसा कुटुंबासाठी काम अन् रात्री शिक्षण घेत 'त्यां'नी बारावीचं मैदान मारलं
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2020 08:01 PM2020-07-16T20:01:36+5:302020-07-16T20:04:06+5:30
कुणी ऑफिसबॉय तर कुणी हॉटेलमध्ये करत होते काम..
पुणे : घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने आई-वडिलांना हातभार लावण्यासाठी दिवसभर काबाडकष्ट करून रात्रीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी इयत्ता बारावीच्या परीक्षेमध्ये उल्लेखनीय यश मिळविले आहे. आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा पार करताना कष्टाचे चीज झाल्याची भावना या विद्यार्थ्यांकडून व्यक्त करण्यात आली.
पूना नाईट हायस्कुल व श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती टॅस्ट कनिष्ठ महाविद्यालयात वाणिज्य शाखेत ११४ विद्यार्थीशिक्षण घेत होते. त्यापैकी ९२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून शाळेचा निकाल ८१.४२ टक्के इतका लागला आहे. ओंकार बने हा विद्यार्थी ८१.४२ टक्के गुणांसह प्रथम आला. तर कुणाल बेंडल (७७.०७) व पल्लवी जाधव (७३.०७) यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळविला. इयत्ता आठवीपासून रात्रशाळेत शिक्षकणारा चिन्मय मोकाशी हा दिव्यांग विद्यार्थी ७४.६१ टक्के गुणांसह उत्तीर्ण झाला. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभुमीवर पहिल्या क्रमांकावरील तीन विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाच्या शुल्काचा खर्च संस्था करणार असल्याची माहिती प्राचार्य अविनाश ताकवले यांनी दिली.
आबासाहेब अत्रे रात्र प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयातून १७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून भावना इंद्रानिया यांनी ६६.९२ टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. तर सिध्दार्थ साठे हा विद्यार्थी ६४ टक्के गुणांसह दुसरा आला आहे.
-------------------------
ऑफिस बॉय रात्रशाळेत पहिला
एका कार्यालयात दिवसभर '' ऑफिसबॉय '' म्हणून काम करणाऱ्या ओंकार बने पुना नाईट स्कुलमध्ये पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. त्याला ७९.८४ टक्के गुण मिळाले आहेत. मुळचा रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथील. मोठा भाऊही रात्रशाळेत शिकुन दिवसभर काम करत आई-वडिलांना हातभार लावायचा. कुणालनेही त्याच्याच पावलावर पाऊल टाकत रात्रशाळेत प्रवेश घेतला. वेळ मिळेल तेव्हा कामाच्या ठिकाणीच अभ्यास करायचा. परीक्षेच्या वेळी महिनाभर सुट्टी घेतली होती. आता पुढेही रात्रशाळेतूनच पदवी मिळवून बँकिंग क्षेत्रात करिअर करायचे असल्याचे त्याने सांगितले.
-------------------
रोजची पहाट अभ्यासाची
सकाळी १० ते ६ या वेळेत खासगी कंपनीत टेलीकॉलींगचे काम. नंतर ६.३० ते ९.३० रात्रशाळा. मग पहाटेचा अभ्यास... अशी कसरत करून सुखसागरनगर येथे राहणारी पल्लवी जाधव पुना नाईट स्कुलमध्ये मुलींमध्ये पहिली आली आहे. आई घरकाम करते. लहान भाऊ सकाळी पेपर टाकण्याचे काम तर मोठी बहीण एका खासगी कंपनीत नोकरीस. तिघेही बहीण भाऊ काम करून आईला हातभार लावत आहेत. पल्लवी अकरावीपासून नाईट स्कुलमध्ये असून पुढेही काम करणार आहे. तिला बँकिंग क्षेत्रामध्ये करिअर करायचे आहे.
-------------
हॉटेलमध्ये काम करून ७७ टक्के गुण
मुळचा चिपळून येथील असलेला कुणाल बेंडल अकरावीपासून रात्र शाळेत आहे. दिवसभर तो हॉटेलमध्ये काम करतो. वडील शेतीकाम करतात. त्यांना आर्थिक हातभार लागावा म्हणून तो पुण्यात आला. इथे पैसे कमविण्याबरोबरच त्याने कष्ट करून घसघशीत गुणांचीही कमाई केली आहे. तो ७७.०७ टक्के गुणांसह शाळेत दुसरा आला आहे. त्याने दोन वर्षात एकदाही आई-वडिलांकडे पैसे मागितले नाही. स्वत:चा खर्च आपल्या कमाईतून भागवितो. पुढेही उच्च शिक्षण घेणार असल्याचे त्याचे वडील सुरेश बेंडल यांनी सांगितले.