त्या मुलांना होतेय अक्षरओळख
By admin | Published: July 31, 2015 03:53 AM2015-07-31T03:53:58+5:302015-07-31T03:53:58+5:30
शाळेचे तोंडही न पाहिलेल्या शालाबाह्य मुलांना शाळेत प्रवेश मिळाला. शिक्षणातील ‘गंमत’ कळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आगळे हसू उमटलेले दिसले. कधीही पेन्सिल व पाटी हातात न घेतलेली
पिंपरी : शाळेचे तोंडही न पाहिलेल्या शालाबाह्य मुलांना शाळेत प्रवेश मिळाला. शिक्षणातील ‘गंमत’ कळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आगळे हसू उमटलेले दिसले. कधीही पेन्सिल व पाटी हातात न घेतलेली मुले शाळा आणि इतर मुलांना निरखून पाहत होती. काही जण आनंदाने फळ्यावर लिहिलेले उत्सुकतेने पाहत होते, तर काही पेन्सिल धरता येत नसल्यामुळे पाटीवर रेघोट्या मारत होते. काही चित्र काढण्याचा प्रयत्न करीत होते. इतर मुलांसमवेत हसत-खेळत असताना आपल्याला त्यांच्यासारखे कधी ‘एक-दोन’ म्हणायला येणार अशा विचारात ती पडली होती. हळूहळू ही मुले शैक्षणिक वातावरणात रुळत असली, तरी काही अडचणी येत आहेत.
सर्वेक्षणानुसार पिंपरी, चिंचवड, भोसरी व सांगवी या चार विभागांनुसार शालाबाह्य मुलांना शाळेमध्ये प्रवेश देण्यास सुरुवात झाली आहे. महापालिकेच्या मराठी व इंग्रजी माध्यमाच्या एकूण १३२ शाळांपैकी ५२ शाळांमध्ये प्रवेश दिला जात आहे. रावेत व नेहरुनगरमधील शाळेत सध्या काही बालके दाखल झाली आहेत.
शालाबाह्य बालकांसाठी शिक्षक घरोघरी जाऊन शाळेत प्रवेश देण्यासाठी पुन्हा शोध घेत आहेत. शाळेपासून वंचित या बालकांना राहत्या ठिकाणापासून नजीकच्या शाळेत आरटीई नियमानुसार दाखल केले जात आहेत. झोपडपट्टीतील बालकांचा व खाणीत काम करणाऱ्या बालकांचा जास्तीत जास्त प्रमाणात यामध्ये समावेश आहे. शालाबाह्य कामासाठी पर्यवेक्षकाची नेमणूक करण्यात आली होती. यासाठी प्रवेशाच्या याद्या पूर्ण करून शाळेच्या मुख्याध्यापकांना सुपूर्त करण्यात आल्या आहेत.
शालाबाह्य बालकांना शहरातील सोनवणेवस्ती, अजंठानगर, जाधववाडी, म्हेत्रेवस्ती, चिखली, कुदळवाडी, तळवडे, दिघी, मोशी, डुडुळगाव, चऱ्होली, चोविसावाडी, भोसरी, पिंपळे निलख, वाकड, कस्पटेवस्ती, थेरगाव, चिंचवडगाव, केशवनगर, ताथवडे, भूमकरवस्ती, रावेत, किवळे, विकासनगर, वाल्हेकरवाडी, खराळवाडी, निगडी, चिंचवड स्टेशन, काळभोरनगर, आकुर्डी, नेहरुनगर, पिंपरी, भाटनगर आदी भागात प्रवेश दिला जाणार आहे.
शालेय बालकांच्या
सर्वेक्षणास मुदतवाढ
दि. ४ जुलैला झालेल्या सर्वेक्षणात काही त्रुटी राहिल्याने ३१ जुलैपर्यंत पुन्हा बालकांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात यावे, अशा सूचना महापालिकेला देण्यात आल्या आहेत. काही परिसरात अधिक लक्ष केंद्रित करण्यास सांगितले आहे. हा अहवाल त्वरित राज्य शासनाकडे पाठवायचा आहे. यानंतर सर्वसाधारण पद्धतीने शिक्षण संचालनालय पथकामार्फत बालकांची तपासणी होणार आहे. या पथकास शालाबाह्य मुले आढळू नये, असे कार्य करण्याचे आदेश महापालिकांना दिले आहेत.
शालाबाह्य मुलांना प्रवेश देण्यासाठी भोसरी, चिंचवड, पिंपरी, सांगवी असे ४ विभाग पाडण्यात आले आहेत. या ४ विभागानुसार ही प्रवेशप्रक्रिया होणार आहे.
शालाबाह्य मुलांना विभागून प्रवेश दिला जात आहे. किती विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला याबाबतची माहिती पिंपरी-चिंचवड महानगरपालिका शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकाऱ्यांकडे नाही. याबाबत त्यांच्याशी संपर्क साधला असता आकडेवारी उपलब्ध नसल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
क्षेत्रीय कधीच शाळेत मध्येच शाळा
कार्यालयन गेलेली मुलेसोडलेली मुले
अ ९८६२
ब ९९७०
क ७६३९
ड ८७९२
ई ७५९७
फ ११२६१
एकूण५४७४२१
विभागएकूण प्रवेशएकूण शाळा
भोसरी१९१५
चिंचवड२८०१४
पिंपरी १५३१३
सांगवी१३४२०