‘ते’ देतात मोफत आरोग्यसेवा, पुण्यातील ५० ते ६० डॉक्टरांचा ग्रुप

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2018 02:05 AM2018-10-03T02:05:28+5:302018-10-03T02:06:10+5:30

सामाजिक जबाबदारी : पुण्यातील ५० ते ६० डॉक्टरांचा ग्रुप; आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भाग

'They' offer free healthcare, group of 50 to 60 doctors in Pune | ‘ते’ देतात मोफत आरोग्यसेवा, पुण्यातील ५० ते ६० डॉक्टरांचा ग्रुप

‘ते’ देतात मोफत आरोग्यसेवा, पुण्यातील ५० ते ६० डॉक्टरांचा ग्रुप

googlenewsNext

पुणे : पुण्यासारख्या पुढारलेल्या जिल्ह्यातील डोंगराळ भागात तसेच आदिवासी पाड्यांमध्ये आजही लोकांसाठी प्राथमिक आरोग्य सुविधा नाहीत. यामुळे सामाजिक जबाबदारीचे भान जपत पुण्यातील काही डॉक्टरांनी पुढाकार घेतला आहे. आंबेगाव तालुक्यातील म्हाळुंगे येथे गावकऱ्यांसाठी मोफत ओपीडी सेवा पुरवत आहेत.

आंबेगाव तालुक्यातील आदिवासी पाड्यांमध्ये आरोग्यसेवा नाही. येथे एसटीदेखील दिवसातून एकदाच येते. छोट्या-मोठ्या आरोग्य सेवांसाठी दूरवरच्या गावांत पायपीट करीत जावे लागते. या करिता पुण्यातील जनआरोग्य मंच या स्वयंसेवी संघटनेने पुढाकार घेवून येथील आदिवासी पाड्यातील लोकांसाठी मोफत आरोग्य सेवा पुरवण्याच्या उद्देशाने स्व. डॉ. शेखर बेंद्रे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू केले. या उपक्रमासाठी जनआरोग्य मंचाच्या ५० ते ६० डॉक्टरांनी पुढाकार घेतला. हे डॉक्टर आपला व्यवसाय आणि काम सांभाळून कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता येथील लोकांना आरोग्यसेवा पुरविण्यासाठी प्रयत्न करतात. ५० ते ६० डॉक्टर एक एक करून चक्राकार पद्धतीने दर रविवारी या पाड्यावर मोफत ओपीडी घेण्यासाठी जातात. त्यामुळे तेथील लोकांना आरोग्य सेवेचा मोफत लाभ घेता येत आहे. यामध्ये जनरल चेकअप आणि औषधी पुरवल्या जातात. रुग्णाचा आजार जास्त असल्यास त्यांना पुढील उपचारासाठी व्यवस्थित मार्गदर्शन करण्यात येते. सध्या दर रविवारी सरासरी ३० ते ४० रुग्ण या मोफत आरोग्य सेवेचा लाभ घेत असतात. सोबतच प्रत्येक रुग्णांचे रेकॉर्ड व्यवस्थित तयार केले जाते. ५ मार्च २०१७ ला हा उपक्रम सुरू करण्यात आला होता. डॉ. शेखर बेंद्रे यांना ट्रेकिंगचा छंद होता. त्यासोबतच ते आदिवासी पाड्यातील लोकांसाठी आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्याचे काम करित असत. त्यांच्या आपत्कालीन मृत्यूनंतर त्यांच्या डॉक्टर्स मित्रांनी त्यांचे नाव या उपक्रमाला दिले. यासाठी एक समन्वय समितीची स्थापन करण्यात आली आहे. ही समिती कोणत्या रविवारी कोणत्या डॉक्टरने केंद्राच्या ठिकाणी जायचे याचे नियोजन करते. या डॉक्टरांनी आपल्या स्वखर्चातूनही ओपीडीसाठी टेबल खुर्ची, तसेच इतर संसाधनांची जमवाजमव केली आहे. या गावांत ओपीडी चालविण्यासाठी तुकाराम पारधी या व्यक्तीने स्वत:च्या घरातील एक खोली या आरोग्य केंद्रासाठी दिली आहे. येथे या आरोग्य केंद्राचे कामकाज चालते.

या भागातील लोकांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. त्यामुळे त्यांच्या आहारात पौष्टिक अन्नाची कमतरता असते. भात हे फक्त त्यांचा मुख्य आहार असल्यामुळे कॅल्शियम, जीवनसत्वे, लोहाची या भागातील लोकांमध्ये प्रचंड कमतरता असते. पावसाळ्याचे महिने वगळता या लोकांच्या आहारात हिरवा भाजीपालाही नसतो. त्यामुळे या लोकांना आहाराविषयीदेखील विशेष मार्गदर्शन आरोग्य केंद्राच्या वतीने करण्यात येते. तसेच नेत्रतपासणी, रक्त तपासणीसारखे कॅम्पसुद्धा आयोजित केले जातात.

ओपीडी सेवा वाढविण्याचा प्रयत्न
१ आरोग्य केंद्रासाठी स्वत:च्या जागेचे शोध घेऊन तेथे बांधकाम करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. येथील लोकांना आरोग्याच्या तक्रारी येऊच नये यासाठी प्रबंधात्मक उपाय म्हणून योग्य आहार आणि औषधांचे मार्गदर्शन करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे, अशी सेवा जास्तीत जास्त गरजू लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी निधीची उभारणी आणि आणखी लोकांनी या उपक्रमात सहभागी होण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.
२ सध्या फक्त रविवारी ओपीडी सेवा सुरू आहे, याचे दिवस वाढविण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. या उपक्रमात जनआरोग्य मंचाचे अध्यक्षा डॉ. लता शेप, सचिव डॉ. अनुप लढ्ढा, डॉ. ज्ञानेश्वर मोटे, डॉ. आशिष मेरूकर, डॉ. जालिंदर वाजे, डॉ. वैषाली पटेकर,
डॉ. बाळासाहेब भोजने, डॉ. प्रज्ञा चव्हाण, डॉ. अरविंद जगताप, डॉ. महारूद्रा ढाके, डॉ. दयानंद गायकवाड आदींचा विशेष सहभाग आहे.

आमच्या भागामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र नसल्यामुळे आरोग्याच्या समस्यांना गावकºयांना सामोरे जावे लागते. या भागातील १८ ते २० गावांतील लोकांना या केंद्राचा फायदा होतो. महिन्यातील पहिल्या रविवारी डॉक्टर नेत्रतपासणी करतात. तसेच गरज वाटल्यास मोफत शस्त्रक्रिया करतात. डॉक्टर फक्त आरोग्य तपासणीच नाही तर, आहार आणि सुयोग्य राहणीमानाविषयीदेखील मार्गदर्शन करतात, जेणेकरून आजारी पडण्याचे प्रमाण कमी राहील.
- अशोक पेकारी, सरपंच, फलोदे, सावर्ली
या सामाजिक उपक्रमामुळे खरंच आत्मिक समाधान मिळत असते. केंद्राच्या ठिकाणी लांबवरून पायी येणाºया रुग्णांचीही संख्या जास्त आहे. त्यांच्यासाठी काम करण्याची जिद्द निर्माण होते. त्यांच्या तोंडून निघणारे उद्गार म्हणजे ‘डॉक्टरसाहेब बरं वाटतंय’ आता यामुळे मिळणारं समाधान खूप मोठे असते, असं मला वाटते.
- किरण महाजन, डॉक्टर
 

Web Title: 'They' offer free healthcare, group of 50 to 60 doctors in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.