...अाणि त्यांनी घेतला अायुष्यातील स्वप्नं एकत्र बघण्याचा डाेळस निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 08:42 PM2018-04-22T20:42:51+5:302018-04-22T20:42:51+5:30
पुण्यातील शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ ट्रस्ट व लुई ब्रेल अंध अपंग कल्याण संस्थेतर्फे अार्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या दाेन अंध भगिनींचा विवाह साेहळ्याचे अायाेजन करण्यात अाले हाेते. हा विवाह साेहळा उत्साहात पार पडला
पुणे : नशीबाने आयुष्यात अंधःकार भरला. परंतु जिद्द मात्र साेबत हाेती. खचून न जाता शिक्षणाची कास धरली. दृष्टी शिक्षणाच्या अाड अाली नाही. अायुष्याचा एक टप्पा तर पार केला. अाता दुसरा टप्प्याला सुरुवात करायची हाेती. अाणि अखेर त्याची साेबत मिळाली आणि त्यांनी घेतला अायुष्यातील स्वप्नं एकत्र बघण्याचा डाेळस निर्णय.
पुण्यातील शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ ट्रस्ट व लुई ब्रेल अंध अपंग कल्याण संस्थेतर्फे अार्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या दाेन अंध भगिनींचा विवाह साेहळ्याचे रविवारी अायाेजन करण्यात अाले हाेते. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित हाेते. यावेळी वाजत गाजत नवरदेवांची मिरवणूक काढण्यात अाली. विवाह मंडपाजवळ मिरवणूक अाल्यानंतर नवरदेवांनीही ठेका धरला. सगळीकडे उत्साहाचे वातावरण हाेते. नववधू वरांना अाशिर्वाद देण्यासाठी माेठी गर्दी झाली हाेती. मंगलाष्टकांच्या नंतर दाेन्ही दापत्यांनी एकमेकांना हार घालत अायुष्यभर एकमेकांची साथ देण्याची शपथ घेतली अाणि सुरु झाला अंधकारमय अायुष्याकडून एका उज्ज्वल भविष्याकडचा प्रवास.
गोव्यातील जिल्हा बसतोराच्या माफसा गावातील संगिता रेड्डी या दृष्टीहिन तरुणीचा विवाह लुई ब्रेल अंध अपंग कल्याण संस्थेतील योगेश वाघमारे या दृष्टीहिन तरुणाशी झाला. संगीता ही गोव्याच्या बसतोरा जिल्ह्याच्या माफसा गावातील असून सध्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे. तर योगेशला आई वडिल नाहीत. तो आठवीपासून लुई ब्रेल अपंग संस्थेत असून संस्थेच्या आॅक्रेस्ट्रामध्ये काम करतो.
तसेच, चंद्रपुर जिल्ह्याची मंदा ढगे या दृष्टीहिन तरुणीचा विवाह उस्मानाबादच्या काजळा गावातील शिवाजी शिंदे या तरुणाशी झाला आहे. मंदाला वयाच्या ५ व्या वर्षी चुकीच्या औषधामुळे अंधत्व आले. या अंधत्वावर मात करीत तिने एम.ए चे शिक्षण घेतले असून ती एम.ए. बी.एड. झाली आहे. सध्या ती लुई ब्रेल संस्थेत शिक्षिकेच्या पदावर नोकरी करीत आहे. शिवाजी हा २५ टक्के अंध असून १२ वी पर्यंत त्याचे शिक्षण झाले आहे. तो सध्या खासगी कंपनीत कार्यरत आहे.
वधू मंदा ढगे म्हणाली, आज आमचे जीवन खऱ्या अर्थाने प्रकाशमय करण्यामागे सेवा मित्र मंडळ, लुई ब्रेल संस्था आणि पुणेकरांचा खूप मोठा वाटा आहे. आपल्या मुलींप्रमाणे प्रेम देऊन आमचा विवाह थाटात करून दिला. हा आनंद व्यक्त करण्यासाठी आमच्याकडे शब्द नाहीत असे ऋण देखील तिने व्यक्त केले.
सेवा मित्र मंडळ आणि इतर गणेशोत्सव मंडळांनी पुढाकार घेऊन लुई ब्रेल संस्थेसोबत या विवाहसोहळ्याची तयारी सुरु केली. गणेशोत्सव मंडळातील पदाधिका-यांनी आणि कार्यकर्त्यांनी या मुलींचे मामा म्हणून कन्यादान केले. मेहेंदी, साखरपुडा, हळदी समारंभ अशा सगळ्या कार्यक्रमात आजूबाजूच्या परिसरातील महिलांनी मोठया उत्साहाने सहभाग घेतला. दरबार, पुणे हे म्युजिकल बँड वरातीमध्ये सहभागी झाले होते. गणेशोत्सव मंडळे, विविध संस्था आणि सामान्य नागरिकांनी दिलेल्या मदतीतून हा विवाहसोहळा मोठया उत्साहात पार पडला.