घरफोडीतून त्यांनी घेतली होंडा सिटी
By admin | Published: July 6, 2016 03:21 AM2016-07-06T03:21:26+5:302016-07-06T03:21:26+5:30
मोटारीतून येऊन घरफोड्या करणाऱ्या टोळीत चक्क त्यातून होंडा सिटीसारखी महागडी कार विकत घेतली व संशय येऊ नये, म्हणून त्याचा गाडीचा वापर करून ते चोऱ्या करीत होते़ चतु:शृंगी पोलिसांनी
पुणे : मोटारीतून येऊन घरफोड्या करणाऱ्या टोळीत चक्क त्यातून होंडा सिटीसारखी महागडी कार विकत घेतली व संशय येऊ नये, म्हणून त्याचा गाडीचा वापर करून ते चोऱ्या करीत होते़ चतु:शृंगी पोलिसांनी
४ जणांच्या टोळीला अटक केली असून, त्यांच्याकडून दोन मोटारींसह
११ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे़
गजराज मोतीलाल वर्मा (वय ३१, रा़ निर्मला स्कूलजवळ, चंदननगर, खराडी), गणेश रथी राणा ऊर्फ गोरे (वय २६, रा़ गावीश, ता़ जि़ मुघलसेन, नेपाळ), सुरेंद्र आस्थाराम चौधरी (वय २२, रा़ खराडी बासपास, चंदननगर, मूळ नेपाळ), नरपतसिंग पूनमसिंग रजपूत (वय ३८, रा़ चंदननगर) अशी त्यांची नावे आहेत़ चतु:शृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत २ जुलै रोजी सहायक पोलीस निरीक्षक संदेश केंजळे हे पेट्रोलिंग करीत असताना त्यांना माहिती मिळाली की, मोटारीतून येऊन घरफोडी करणारी टोळी या भागात फिरत आहे़ त्यावरून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळे निलखकडून बालेवाडीकडे जाणाऱ्या आंबेडकर पुलाजवळ ही टोळी येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली़ त्यानुसार सापळा रचून मोटारीतून आलेल्या ४ जणांना ताब्यात घेतले़ त्यांच्याकडे ५ लहान-मोठ्या लोखंडी कटावणी, हेक्सा फ्रेम ब्लेडसह पक्कड, स्क्रू ड्रायव्हर, गुप्ती असे घरफोडीचे साहित्य तसेच डीव्हीआर मशीन व सिगारेटचे दोन बॉक्स मिळून आले़
त्यांच्याकडून चतु:शृंगीकडील घरफोडीचे ७, हडपसर पोलीस ठाण्याचा एक आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्याकडील वाहनचोरीचा एक असे ९ गुन्हे उघडकीस आले आहेत़ ही कामगिरी पोलीस उपायुक्त डॉ़ बसवराज तेली, सहायक पोलीस आयुक्त वैशाली जाधव, पोलीस निरीक्षक दयानंद ढोमे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक संदेश केंजळे, प्रमोद क्षीरसागर, हवालदार बाळासाहेब गायकवाड, अजय येवरीकर, मुन्ना शेख, अजय गायकवाड, संतोष जाधव, मल्हारी चव्हाण, विकास मडके, सारस साळवी, प्रवीण पाटील, श्रीनाथ जाधव यांनी केली़ (प्रतिनिधी)
सर्व आरोपी सराईत गुन्हेगार
याबाबत पोलीस उपायुक्त डॉ़ बसवराज तेली यांनी सांगितले की, हे सर्व जण मूळचे राजस्थानचे असून ते सराईत गुन्हेगार आहेत़ गजराज वर्मा याच्या नावावर १० गुन्हे आहेत़ राणा याच्या नावावर ४ आणि चौधरीच्या नावावर ५ गुन्हे असून, हे सर्व घरफोडीचे गुन्हे आहेत़ ते चोरीची मोटार घेऊन गुन्हे करीत असत़ या घरफोडीतून मिळालेल्या पैशातून गजराज आणि प्रभू पटेल यांनी होंडा सिटी घेतली आहे़ सध्या ती पटेल याच्या नावावर असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत़