बंधाऱ्यावर म्हशींना घेऊन गेले अन् परतलेच नाहीत; शेतकऱ्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2023 05:54 PM2023-05-18T17:54:47+5:302023-05-18T17:54:47+5:30
दोन दिवसांनी शेतकऱ्याचा मृतदेह बंधाऱ्याजवळ आढळून आला
नसरापूर : कुरंगवडी (ता.भोर) येथील शेतकरी गोठ्यातील जनावरांना पाणी पाजण्यासाठी बंधाऱ्यावर घेऊन गेला असताना पाण्यात बुडुन मृत्यु झाल्याची घटना येथे नुकतीच घडली. राजगड पोलिस ठाण्यात माहीती दिल्यावर पोलिसांनी आकस्मिक मृत्यु म्हणुन नोंद केली आहे. शंकर विठोबा कचरे (वय ५४ वर्षे रा.कुरंगवडी ता.भोर) यांचा या शेतकऱ्याचा दुर्दैवी घटनेत पाण्यात बुडुन मृत्यु झाला आहे. याबाबत पोलिस पाटील नरेश शिळीमकर यांनी राजगड पोलिस ठाण्यात माहिती दिली आहे.
गेल्या मंगळवारी ( दि.१६) रोजी शेतकरी शंकर कचरे हे नेहमी प्रमाणे दुपारी त्यांच्या गोठ्यातील दहा ते बारा म्हशी घेऊन सांगवी-घोरेपडळ गावा जवळील गुंजवणी नदीच्या बंधाऱ्यावर घेऊन गेले होते. त्यानंतर संध्याकाळी या म्हशी घरी परत गेल्या, परंतु त्यांचे सोबत गेलेले कचरे पुन्हा घरी परतले नाही. त्यामुळे घरच्यांनी कचरे यांचा सर्वत्र शोध घेतला मात्र कचरे सापडले नाहीत. दुसऱ्या दिवशी पुन्हा घरातील सर्व जण कचरे यांच्या शोधासाठी पुन्हा घरा बाहेर पडले. तेंव्हा त्यांना सांगवी-घोरेपडळ येथील बंधाऱ्या लगत कचरे यांचे कपडे व चप्पल मिळून आली. त्यावेळी त्यांचा शोध घेताना बंधाऱ्यातील पाण्यातही शोध घेतला असता त्यात शंकर कचरे असता त्यांचा मृतदेह आढळला. याबाबत अनिल शंकर कचरे (वय २७ वर्षे) यांनी नसरापूर येथील राजगड पोलिस ठाण्यात खबर दिली असुन पुढील तपास पोलिस हवालदार गणेश कुदळे करीत आहेत.