पाणी शोधायला गेले अन् जीव गमावून बसले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2016 02:08 AM2016-04-14T02:08:43+5:302016-04-14T02:08:43+5:30
तालुक्यातील सुरवड ग्रामपंचायतीच्या विहिरीचे खोलीकरण करतेवेळी स्फोट घडवल्यानंतर, शिल्लक राहिलेल्या स्फोटकांचा स्फोट झाल्याने दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला. तिघे जण गंभीर
इंदापूर : तालुक्यातील सुरवड ग्रामपंचायतीच्या विहिरीचे खोलीकरण करतेवेळी स्फोट घडवल्यानंतर, शिल्लक राहिलेल्या स्फोटकांचा स्फोट झाल्याने दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला. तिघे जण गंभीर जखमी झाले.
आज (दि. १३) सकाळी
दहा वाजण्याच्या सुमारास ही
घटना घडली. पाणी शोधायला
गेले आणि जीव गमालेल्या
‘त्या’ कामगारांविषयी हळहळ व्यक्त होत आहे.
कांतिलाल नरहरी शिंदे
(वय ३५, रा. शेटफळ हवेली, ता. इंदापूर), कृष्णा महादेव भोसले (वय ५० वर्षे, रा. भांडगाव, ता. इंदापूर) अशी मरण पावलेल्या
कामगारांची नावे आहेत. महादेव मच्छिंद्र कटाळे (वय ४० वर्षे), मारुती रामकृष्ण चौगुले (वय ४५ वर्षे), नितीन वामन शिंदे (वय ३३ वर्षे, सर्व रा. शेटफळ हवेली, ता. इंदापूर) अशी जखमींची नावे आहेत. जखमींना उपचारासाठी अकलूज (ता. माळशिरस, जि. सोलापूर) येथे पाठवण्यात आले आहे.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, सुरवड ग्रामपंचायतीच्या ताब्यातील विहिरीचे पाणी आटत आले होते. त्यामुळे शनिवारपासून त्या विहिरीतील गाळ काढण्याचे काम सुरू होते. शेटफळ हवेली येथील हरिभाऊ शिंदे यांची यारी त्यासाठी वापरात आणण्यात येत होती.
सोमवारी विहिरीचे खोलीकरण करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला. परंतु स्फोटके उडविण्याची जबाबदारी कोणीही कामगार घेत नव्हता. ती जबाबदारी ग्रामपंचायतीने घेतली.
त्यानुसार मंगळवारी विहिरीत स्फोटके उडवण्यात आली. आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास काम करण्यासाठी कामगार विहिरीत उतरले. त्यानंतर काही वेळातच विहिरीत शिल्लक राहिलेल्या स्फोटकांचा स्फोट झाला व ही दुर्घटना घडली. (वार्ताहर)
उशिरापर्यंत गुन्हा नाही
या संदर्भात वृत्त लिहीपर्यंत पोलिसांकडे कसलीही नोंद झाली नव्हती. जखमींवर अकलूज येथे उपचार सुरू आहेत. त्यापैकी कुणी खबर अगर फिर्याद दिली तर पोलीस ठाण्यात तशी नोंद होईल, असे सहायक पोलीस निरीक्षक विलास नाळे यांनी सांगितले.
या प्रकरणाची व स्फोटके उडवण्यासाठी ग्रामपंचायतीने रीतसर परवानगी घेतली होती का, याची चौकशी करण्यात यावी. मयतांच्या कुटुंबीयांना व जखमींना तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी.
- संजय कांबळे,
तालुका संघटक, भारतमुक्ती मोर्चा