' ते ' नक्कीच लवकर घरी परत येतील ! पाषाणकर कुटुंबियांचा विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2020 05:13 PM2020-10-23T17:13:18+5:302020-10-23T17:15:00+5:30
गौतम पाषाणकर यांची आत्महत्येसंदर्भातील चिठ्ठी आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे
पुणे : वडिलांना कोणत्या व्यवसायात एवढे आर्थिकदृष्ट्या अपयश आलंय हेच आम्हाला कळायला मार्ग नाही. आपल्या खिशात जेव्हा पैसे नाहीत तेव्हा असा विचार करणे ठीक आहे..पण पैसे नाहीत असेही काही नाही. त्यांच्या सुख दुःखात कुटुंब नेहमी त्यांच्या बरोबर होते आणि कायमच राहील. थोड्या मानसिक ताणतणावामुळे कदाचित ते बाहेर पडले असावेत पण ते नक्कीच कुठेतरी आहेत. त्यांचा लवकरच पोलीस शोध घेतील आणि ते घरी परत येतील...असा विश्वास प्रसिद्ध पाषाणकर उद्योग समूहाचे प्रमुख गौतम पाषाणकर यांचा मुलगा कपिल पाषाणकर यांनी व्यक्त केला.
पुण्यातील वाहन उद्योग क्षेत्रातील पाषाणकर ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक गौतम पाषाणकर हे बुधवारी ( २१ ऑक्टोबर) सायंकाळपासून बेपत्ता आहेत. यासंदर्भात त्यांचा मुलगा कपिल पाषाणकर यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी शोध सुरु केला असता तपासादरम्यान गौतम पाषाणकर यांची आत्महत्येसंदर्भातील चिठ्ठी आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या चिठ्ठीमध्ये व्यवसायातील आर्थिक नुकसानामुळे आत्महत्या करत असल्याचं त्यांनी लिहिलं आहे. यापार्श्वभूमीवर कपिल पाषाणकर यांच्याशी ' लोकमत' ने संपर्क साधला असता आम्हाला त्यांनी कोणत्या व्यावसायिक आर्थिक नुकसानीबद्दल म्हटले आहे. याबाबत काहीच कल्पना नसल्याचे सांगितले.
कपिल पाषाणकर म्हणाले, आम्हाला पाच वर्षांपूर्वीच व्यवसायात आर्थिक नुकसान सहन करावे लागले. त्यात आत्ताचं असं काहीच नव्हतं. आज बँकेची जी देणी आहेत त्या तुलनेत आमची मालमत्ता दुप्पट किंमतीची आहे. ज्यावेळी जनरल मोटर्स ही कंपनी भारतातूनच बाहेर पडली. त्यावेळी आमच्या ऑटोमोबाईल व्यवसायाला जवळपास १०० कोटी रुपयांचे नुकसान झाले. आमच्याकडे ८०० कर्मचारी काम करत होते. ३०० कोटी रुपयांची आमची उलाढाल होती. त्यामुळे यापूर्वी देखील आम्ही अपयश पाहिले आहे. तरी कधी कुणी खचून गेले नाही. आम्ही हळूहळू त्यातून बाहेर पडलो. जुन्या बँकांची १३० कोटी रुपयांची कर्ज देखील आम्ही फेडली . त्यानंतर नवीन बँकांकडून देखील ८ ते १० कोटी रुपयांचे कर्ज आम्हाला मिळाले. आज सगळं व्यवस्थित सुरू आहे.
माझ्या मते ते माझ्या बहिणीचे सारखे टेन्शन घ्यायचे. तिचीच त्यांना काळजी वाटे. ती त्यांचा विक पॉईंट आहे. त्यांचा केवळ प्रायव्हेट फायन्सरशीच आर्थिकदृष्ट्या मानसिक ताणतणावाचा व्यवहार होता. ज्या कंपनीशी हा व्यवहार होता. त्याची संचालक माझी बहीण होती. त्या कंपनीला त्यांचे पैसे देखील दिले. पण तरी त्यांना भीती वाटायची.त्यामुळे ते खूप अस्वस्थ असायचे. सध्या तरी हेच त्यांच्या मानसिक ताणतणावाचे कारण आम्हाला वाटते. पण ते नक्कीच घरी परत येतील..हा आमचा विश्वास कायम आहे, असेही कपिल पाषाणकर यांनी सांगितले.
........