चोरट्यानं घातली थेट पोलिसांच्या अंगावर रिक्षा; दोघे गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 03:04 PM2021-09-29T15:04:02+5:302021-09-29T15:04:20+5:30
घटनेत त्यांच्या पाठीच्या मणक्याला गंभीर जखम झाली असून ६० टक्के दुखापत झाली आहे
पुणे : रिक्षा चोरुन नेत असल्याचे समजल्यावर पोलिसांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. तेव्हा चोरट्याने पोलीस मार्शलच्या अंगावर रिक्षा घालून त्यांना जखमी करुन पळून गेला. ही घटना धानोरीतील भैरवनगर येथील गोकुळनगर भाजी मंडईमागे मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता घडली.
दीपक राजमाने हे लष्करातून निवृत्त झाले असून त्यानंतर ते पोलीस सेवेत दाखल झाले आहेत. या घटनेत त्यांच्या पाठीच्या मणक्याला गंभीर जखम झाली असून मणका ६० टक्के दुखापत झाली आहे. कंमाड हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे़ शिरसाट यांचा पायाला जखम झाली आहे.
याप्रकरणी पोलीस नाईक गणेश शिरसाट यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गणेश शिरसाट आणि दीपक राजमाने हे धानोरी मार्शल म्हणून मंगळवारी सायंकाळी गस्त घालत असताना एका मुलाने गोकुळनगर भाजी मंडईमागे आमच्या सोसायटीसमोर एक रिक्षा दोन दिवसापासून तेथेच होती. ती एक जण घेऊन जात असल्याचे सांगितले. हा चोरीचा प्रकार असावा, असे वाटून दोघेही मार्शल घटनास्थळी गेले.
राजमाने यांनी रिक्षाचालकास थांबण्याचा इशारा केला. तेव्हा त्याने त्याच्या ताब्यातील दुसरी रिक्षा घेऊन तो वेगाने निघाला. दोन्ही पोलिसांनी रिक्षाचा पाठलाग केला. राजमाने हे रिक्षाच्या समोर येऊन थांबले असताना त्याने राजमाने यांच्या अंगावर रिक्षा घालून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. राजमाने यांनी रिक्षाच्या साईड बारला पकडण्याचा प्रयत्न केला. पण त्याने रिक्षा वेगात चालवल्याने राजमाने हे खाली पडून जखमी झाले.
गणेश शिरसाट यांनी सरकारी मोटारसायकलवरुन त्याचा पाठलाग केला. तेव्हा त्याने रिक्षाने मोटारसायकलला धडकन देऊन शिरसाट यांना जखमी करुन पळून गेला. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक सचिन निकम यांनी सांगितले की, चोरट्याची रिक्षा मिळाली असून त्याचा शोध घेतला जात आहे