पूजेसाठी ठेवलेले दागिने चोरणाऱ्यास 24 तासांत अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2020 11:37 AM2020-11-17T11:37:35+5:302020-11-17T11:43:14+5:30
Pune Crime News : चोरी केलेले 11 तोळे सोन्याचे दागिने, दोन मोबाईल व रोख रक्कम असा सुमारे 4 लाख 60 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.
पुणे/ येरवडा - लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजेसाठी ठेवले दागिने व रोख रक्कम चोरी करणाऱ्या आरोपीला येरवडा पोलिसांनी 24 तासांत जेरबंद केले. अविनाश उर्फ सुक्या संजय शिंदे (वय 18, रा. जय जवान नगर येरवडा) याच्यासह एका अल्पवयीन विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडून चोरी केलेले 11 तोळे सोन्याचे दागिने, दोन मोबाईल व रोख रक्कम असा सुमारे 4 लाख 60 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री येरवड्यातील जयजवाननगर येथे मानसिंग भोसले यांच्या अर्धवट उघड्या ठेवलेल्या खिडकीतून हात घालून कडी उचकटून घरातील दागिने, मोबाईल व रोख रक्कम असा मुद्देमाल लंपास केला होता. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. येरवडा तपास पथकातील कर्मचारी पोलीस हवालदार गणपत थीकोळे, पोलीस नाईक नवनाथ मोहिते, शिपाई राहुल परदेशी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, या गुन्ह्यातील आरोपी येरवड्यातील गेनबा मोझे शाळेजवळ उभे असल्याची माहिती मिळाली होती. तात्काळ सापळा रचून त्यांना ताब्यात घेण्यात आले. अधिक तपासात त्यांनीच हा गुन्हा केल्याची कबुली दिली. गुन्हा घडल्यानंतर चोवीस तासाच्या आत आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील गुन्ह्यातील 11 तोळे सोन्याचे दागिने 2 मोबाईल व रोख रक्कम असं चार लाख 60 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख गुन्हे निरीक्षक अजय वाघमारे, यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर करपे, सहा. फौजदार प्रदीप सुर्वे, हवालदार गणपत थीकोळे, पोलीस कर्मचारी नवनाथ मोहिते, राहुल परदेशी, सुनील सकट, समीर भोरडे, अहमद शेख, अनिल शिंदे, गणेश वाघ, तेजस पवार, किरण घुटे यांच्या पथकाने गुन्हा दाखल झाल्यानंतर 24 तासाच्या आत गुन्ह्यांचा तपास लावला.