लायसन्स परत करुन चाेरट्याची लिमिटेड माणूसकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 04:30 PM2018-03-31T16:30:09+5:302018-03-31T21:10:28+5:30
पुण्यात एक अागळी-वेगळी चाेरीची घटना समाेर अाली अाहे. एका चाेराने कारमधील बॅग चाेरली. काही दिवसांनी त्यातील लायसन्स महिलेला कुरिअर करुन परत केले.
पुणे : शहर जसं स्मार्ट सिटी हाेतंय, तसेच पुण्यातले चाेरही स्मार्ट हाेत चालले अाहेत. एक अागळी-वेगळी चाेरीची घटना पुण्यात घडली अाहे. एका चाेराने चाेरलेल्या बॅगेतील लायसन्स चक्क कुरिअर करत फिर्यादीला परत पाठवल्याची घटना समाेर अाली अाहे.
पुण्यातील व्यावसायिक सपना डे यांच्यासाेबत ही घटना घडली अाहे. सपना या 17 मार्च राेजी संध्याकाळी साडेसहा च्या सुमारास अापली कार रेस काेर्सच्या शेजारी पार्क करुन पायी फिरण्यासाठी गेल्या हाेत्या. अर्ध्यातासाने परत अाल्यावर त्यांच्या गाडीची काच फाेडून मागील सीटवरील बॅग चाेरांनी चाेरुन नेली हाेती. त्या बॅगेत त्यांचे लायसन्स, घराच्या व दुकानाच्या चाव्या अाणि पंधराेशे रुपये हाेते. ही घटना समजताच सपना यांनी वानवडी पाेलीस चाैकीमध्ये तक्रार दाखल केली. लायसन्स चाेरीला गेल्याने त्यांना गाडी चालवणे अवघड झाले हाेते. त्यांनी त्यांच्या मुलाला सांगून नवीन लायसन्स काढण्याची प्रक्रीया सुरु केली. लायसन्स गमवल्याची खंत त्यांना हाेती. त्यांच्याकडे त्याची झेराॅक्सही नव्हती. परंतु गुरुवारी त्यांच्या नावाने अालेले पार्सल पाहून त्यांना धक्काच बसला. ज्या चाेराने त्यांची बॅग चाेरली हाेती त्याने चक्क सपना यांचे लायसन्स कुरिअर करुन पाठवले हाेते.
सपना या गेल्या 29 वर्षांपासून रेस काेर्स जवळ चालण्यास जातात. मात्र असा प्रसंग त्यांच्यसाेबत पहिल्यांदाच घडला अाहे. अाधी त्या दुचाकीवर या ठिकाणी जात असत. गेल्या काही काळापासून त्यांनी कार वापरण्यास सुरुवात केली हाेती. या प्रसंगाबाबत बाेलताना सपना म्हणाल्या, 17 मार्च राेजी रेस काेर्सजवळ गाडी लावून चालण्यास गेले हाेते. अाल्यावर गाडीची काच फाेडून मागच्या सीटवरील बॅग चाेरल्याचे समाेर अाले. बॅगमध्ये लायसन्स ,पेसै तसेच घराच्या व दुकानाच्या चाव्या हाेत्या. गुरुवारी माझ्या नावाने कुरिअर अाले, ते उघडून पाहिल्यावर त्यात माझे लायसन्स असल्याचे समाेर अाले. चाेर बहुदा स्मार्ट असावेत त्यांनी माझे लायसन्स परत केले मात्र त्यासाेबत बाकीच्या गाेष्टी त्यांनी पाठवल्या नाहीत.