...अन् ती फेसबुक फ्रेंड रिक्वेस्ट महिलेला 8 लाखाला पडली
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2019 11:01 PM2019-02-17T23:01:01+5:302019-02-17T23:03:21+5:30
घरात शिरुन ज्येष्ठ नागरिक महिलेची तिजोरी साफ
पुणे : फेसबुकवर झालेल्या ओळखीतून ज्येष्ठ महिलेच्या घरात शिरलेल्या एकाने तिजोरीतील ८ लाख ८ हजारांचे दागिने लांबवल्याची घटना खराडी भागातील एका सोसायटीत घडली. याप्रकरणी राहुल हमीर मर्चंट (वय ४३, रा. टस्कन इस्टेट, खराडी) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मर्चंट यांचा शेअर व्यावसायिक आहेत. खराडी भागातील एका उच्चभ्रू सोसायटीत ते आणि त्यांची ६९ वर्षाची आई राहायला आहे. जुलै २०१८ मध्ये त्यांच्या आईला अनिल ननवाणी याने फेसबुक फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. ती आईने स्वीकारल्यावर ननवाणी याने त्यांच्याशी संपर्क साधून आपल्याला आईवडिलांनी घराबाहेर काढले असून त्यास कोणाचा आधार नाही, अशा प्रकारचे भावनिक चॅटिंग करत होता. ओळख वाढल्यानंतर राहुल मर्चंट कामानिमित्त मुंबईला गेले असल्याचे पाहून तो दोन ते तीन वेळा त्यांच्या घरी आला होता.
दरम्यान गेल्या वर्षी १६ डिसेंबर २०१८ रोजी ते काही कामानिमित्त मुंबईला गेले होते. त्यावेळी त्यांची आई घरात एकटी होती. आई स्वयंपाकाच्या गडबडीत होती. दुपारी एकच्या सुमारास ननवाणी हा घरी आला. आईचे लक्ष नसल्याची संधी साधून तिजोरीची चावी चोरली. तिजोरीतील रोकड, सोने-चांदीचे दागिने आणि दोन घड्याळे लांबवून तो पसार झाला. तिजोरीतील दागिने चोरीला गेल्याचे निदर्शनास आल्यानंतर व्यावसायिकाने पोलिसांकडे नुकतीच तक्रार दिली. चंदन नगर पोलिसांनी अनिल ननवाणी (रा. मुंबई) याच्याविरुद्ध गुन्हा दखल केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मुळीक या गुन्ह्याचा तपास करत आहेत.