खानावळीच्या आडून चोरी करणारा जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:11 AM2021-06-09T04:11:45+5:302021-06-09T04:11:45+5:30
आकाश अशोक उमाप (रा. वानवडी, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, वाहनचोरी, घरफोडीच्या अनुषंगाने तपास करीत ...
आकाश अशोक उमाप (रा. वानवडी, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
पोलिसांनी सांगितले की, वाहनचोरी, घरफोडीच्या अनुषंगाने तपास करीत असताना वानवडी परिसरात मेसमध्ये जेवण बनवणे व डबे पोहोचविणारा चोरी करत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार वानवडी परिसरात संशयावरून सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक तपास केला असता आकाश उमाप हा वानवडी परिसरात एका मेसमध्ये जेवण बनवणे व डबे पोहोचविण्याचे काम करीत असताना बंद घराची रेकी करत साथीदाराच्या मदतीने घरफोडी, वाहनचोरी, जबरीचोरी केल्याची कबुली दिली. सदरचे गुन्हे त्याने रेकॉर्डवरील आरोपी जयसिंग कालूसिंग जुन्नी ऊर्फ पिलु, सोमनाथ ऊर्फ सोम्या गारुळे (दोघे रा. बिराजदारनगर, हडपसर) यांच्या मदतीने केल्याचे तपासात उघडकीस आले. आकाशने पुणे शहरामध्ये १३ घरफोडी, एक वाहनचोरी, एक जबरी चोरी असे एकूण १५ गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांच्याकडून ७७ ग्रॅम सोन्याचे दागिने, एक किलो चांदीच्या वस्तू व दागिणे, दोन दुचाकी, एक टीव्ही आणि ४६ हजार रुपये रोख रक्कम असा एकूण ६ लाख ७० हजारांचा मुद्देमाल हस्तगत केल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-६चे पोलीस निरीक्षक गणेश माने, सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्रपाटील, पोलीस अंमलदार मच्छिंद्र वाळके, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, नितीन शिंदे, प्रतिक लाहिगुडे, शेखर काटे, नितीन धाडगे, सचिन पवार, ऋषिकेश ताकवणे, ऋषकेश व्यवहारे, ऋषिकेश टिळेकर व सुहास तांबेकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.