'FTII'मध्ये चोऱ्या करणाऱ्याला अटक; साफसफाई करताना दाखवली 'हात की सफाई'
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2020 02:38 PM2020-12-26T14:38:59+5:302020-12-26T14:44:19+5:30
एफटीआयमध्ये साफसफाईच्या बहाण्याने ही चोरी केल्याचे तपासात निष्पन्न...
पुणे : सुरक्षा रक्षक असलेल्या एफटीआयआय या सुरक्षा रक्षक असलेल्या संस्थेतील पार्किंगमधील दुचाकी गाड्यांच्या बॅटर्यासह अनेक साहित्य चोरीला गेले होते. या चोरीचा तपास डेक्कन पोलिसांनी अल्पावधीत लावून चोरीच्या मालासह टेम्पो जप्त केला आहे. राहुल राम भांडवे (वय ३२, रा. दत्तवाडी) याला पोलिसांनी अटक केली आहे.
याप्रकरणी भगवान गणपती शेकापूरे (वय ५७, रा. कोथरुड) यांनी फिर्याद दिली आहे. एफ टीआय येथे एकूण ५२ सुरक्षारक्षक असून त्यांचे तीन शिफ्टमध्ये काम चालते. २५ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता त्यांनी आवाराची पाहणी केली असता विद्यार्थी वसतीगृह येथील वाहन पार्किंगच्या ठिकाणी पार्क केलेल्या १० दुचाकी वाहनांंच्या बॅटर्या चोरीस गेल्याचे दिसून आले. तसेच त्या ठिकाणी असलेले लोखंडी खिडक्यांचे ग्रील, पाईप, लोखंडी बॉक्स, ट्युबलाईट कव्हर असा सर्व मिळून १८ हजार ५०० रुपयांचा माल चोरीला गेला होता. याची तक्रार डेक्कन पोलीस ठाण्यात देण्यात आली होती.
त्याचदरम्यान पोलीस उपनिरीक्षक किशोर शिंदे यांना माहिती मिळाली की, एका तीन चाकी टेम्पोतून चोरीचा माल विक्रीसाठी जात आहे. त्यानुसार त्यांनी म्हात्रे पुलाजवळ सापळा रचला. सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास एक टेम्पो येताना दिसला. त्याला काही अंतरावर टेम्पोला पोलिसांनी थांबविले. टेम्पोमधील मालाची तपासणी केली असता एफटीआयमध्ये चोरलेला माल त्यात दिसून आला. पोलिसांनी हा १८ हजार ५०० रुपयांचा चोरीचा माल आणि तो वाहून नेत असलेला २ लाख रुपयांचा टेम्पो जप्त केला आहे.
राहुल भांडवे याने एफटीआयमध्ये साफसफाईच्या बहाण्याने ही चोरी केल्याचे तपासात निष्पन्न् झाले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे, गुन्हे निरीक्षक संजय मोगले, उपनिरीक्षक किशाेर शिंदे, हवालदार संजय शिंदे, कापरे, तरंगे, गोरे यांनी हा तपास केला.