बंधाऱ्याचे ढापे चोरणाऱ्याला रंगेहाथ पकडला; तब्बल ८९ हजारांचे २९७ लोखंडी ढापे जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2021 06:42 PM2021-11-30T18:42:39+5:302021-11-30T18:42:52+5:30
कोल्हापूर बंधाऱ्याचे २९७ लोखंडी ढापे चोरल्याप्रकरणी ३ जणांना मुद्देमालासह खेड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे
राजगुरुनगर : खेड तालुक्यातील वाटेकरवाडी येथील कोल्हापूर बंधाऱ्याचे २९७ लोखंडी ढापे चोरल्याप्रकरणी ३ जणांना मुद्देमालासह खेडपोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पाटबंधारे विभागाचे कर्मचारी दत्तात्रय लक्ष्मण गुंडाळ (रा. तिन्हेवाडी रोड, राजगुरूनगर) यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
टेकबहादुर करमसिंग बोहरा (वय ३५ सध्या रा.पिंपरी पुणे), सुनिल विजय कोळी (वय २० मुळगाव सध्या रा.पिंपरी पुणे), तुकाराम पांडूरंग कांबळे (वय २१ सध्या रा. काळेवाडी पिंपरी) यांना पोलिसांनीअटक केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, या आरोपींनी निमगाव व वाटेकरवाडी गावचे परिसरातील भिमानदी लगत बंधाऱ्याशेजारी ठेवण्यात आलेले लोखंडी ढापे रात्रीच्या वेळी चोरून घेऊन जात होते. दरम्यान रात्रीच्या नाईट राऊडला खेड पोलिसांची गाडी फिरत असताना एक संशयितरित्या जाताना टेम्पो पोलिसांना आढळून आला. टेम्पो चालकाची चौकशी केल्यावर त्यांनी चोरीची कबुली देऊन इतर दोन साथीदारांची नावे सांगितली. एकूण २९७ जीर्ण झालेले ८९ हजार रुपये किंमतीचे लोखंडी ढापे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
तालुक्यात ठिकठिकाणी बंधाऱ्याचे जीर्ण व निकामी झालेले लोखंडी ढापे बंधाऱ्यालगत ठेवले जात असतात. याकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने चोरट्यांचे फावत आहे. वाटेकरवाडीचे ढापे चोरट्यांनी चोरले तरी पाटबंधारे विभागाला याचा थांगपत्ता नव्हता. पोलिसांनी पाटबंधारे विभागाला माहिती दिल्यानंतर पाटबंधारे विभागाला जाग आली. आरोपीनी इतर काही चोऱ्या केल्या आहेत का याबाबत पुढील तपास पोलिस हवालदार संतोष घोलप करीत आहे.