औंधमधील त्या प्रकरणातील चोरट्यांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:10 AM2021-01-14T04:10:57+5:302021-01-14T04:10:57+5:30
पुणे : औंध येथील शैलेश टॉवर येथे घरफोडी करुन जाणार्या चोरट्यांना पाहून बीट मार्शल पळून गेले होते. या प्रकरणात ...
पुणे : औंध येथील शैलेश टॉवर येथे घरफोडी करुन जाणार्या चोरट्यांना पाहून बीट मार्शल पळून गेले होते. या प्रकरणात शहर पोलीस दलाची मोठी नाचक्की झाली होती. घरफोडी करणार्या या टोळीला पकडण्यात अखेर पोलिसांना यश आले. चतु:श्रृंगी पोलीस व गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या पथकाने संयुक्त कारवाई करत टोळीला पकडले.
बिरजूसिंग रजपुतसिंग दुधाणी (वय ३७, रा. रामटेकडी हडपसर), बिंदुसिंग शामसिंग कल्याणी (वय २४), रविसिंग शामसिंग कल्याणी (वय २२), हुकूमसिंग रामसिंग कल्याणी (वय २८, तिघेही रा. रामटेकडी, हडपसर), संगतसिंग अजमेरसिंग कल्याणी (वय ३७, रा. थेऊर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हे सर्व आरोपी रेकॉर्डवरील असून बितूसिंग याच्यावर ५८, रविसिंग याच्यावर ४९, तसेच हुकूमसिंग याच्यावर २६ गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.
याबाबत पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
औंध परिसरातील शैलेश टॉवर येथे २८ डिसेंबर रोजी हा प्रकार घडला होता. चोरट्यांना पाहून पोलीस पळून गेले होते. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता.
या गुन्ह्यातील चोरट्यांचा पकडण्याचे पोलिसांसाठी एक आव्हान झाले होते. या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा करत होती. बिरजूसिंग व बिंतूसिंग रामटेकडी परिसरात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. पोलिस उपनिरीक्षक महेश भोसले यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्याने चाकूने वार केले. पण, त्यांनी वार चुकवून बिरजूसिंगला अटक केली होती. या गुन्ह्यात चार आरोपींचा शोध सुरू होता. युनिट तीनचे पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी आरोपीचा शोध घेत होते. दरम्यान आरोपी शेवाळेवाडी परिसरात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार उपनिरीक्षक दत्ता काळे यांच्या पथकाने चौघांना अटक केली.
ही कामगिरी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, अपर पोलिस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त बच्चन सिंग, सहायक पोलिस आयुक्त लक्ष्मण बोराटे, सुरेंद्रनाथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अनिल शेवाळे, राजेंद्र मोकाशी यांच्या पथकाने केली.
---
टोळीवर लावणार मोक्का
या आरोपींनी अनेक गुन्हे केले आहेत. करोनाच्या पार्श्वभुमीवर पॅरोलवर बाहेर आले होते. त्यानंतर त्यांनी गुन्हे करण्यास सुरूवात केली होती. औंध परिसरात घरफोडीसाठी वापरलेली कार एक दिवस अगोरदर त्यांन चोरली होती. या टोळीने अनेक गुन्हे केले आहेत. त्यामुळे सर्व कायदेशीर गोष्टी पडताळून या टोळीवर मोक्काची कारवाई केली जाईल, असे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले.