माजी पोलीस महासंचालकांच्या घरी चोरी करणार्या चोरट्यांना हरियाणातून केले जेरबंद; सराफासह तिघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2021 09:27 PM2021-06-15T21:27:55+5:302021-06-15T21:28:42+5:30
१ कोटी ३४ लाख ९५ हजार ६४१ रुपयांचे डायमंड व सोन्याचे दागिने आणि रोकड चोरुन नेली होती.
पुणे : उंड्री येथील न्याती विंड चेंइम्स सोसायटीतील माजी पोलीस महासंचालक राज खिलनानी यांच्यासह दोन घरात घरफोडी करुन तब्बल १ कोटी ३४ लाखांचा ऐवज लंपास करणार्या चोरट्यांना कोंढवा पोलिसांनी हरियानाहून जेरबंद केले आहे. त्यांच्याबरोबरच चोरीचे दागिने विकत घेणार्या सराफालाही अटक करण्यात आली आहे.
राजेशकुमार माहेनलाल सरोज (वय ३३), राकेशकुमार मोहनलाल सरोज (वय ३०, दोघे रा. नवी दिल्ली) आणि सराफ मदनलाल मोहनलाल कुम्हार (वय ३०, रा. राजसंमद, राजस्थान) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
कोंढवा पोलिसांनी या अगोदर मनिषकुमार ऊर्फ सौरभ मदनलाल सरोज (वय १९, रा. वसई, ठाणे) याला अटक केली होती. राजेशकुमार, राकेशकुमार आणि मनिषकुमार हे मुळचे उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यातील राहणारे आहेत.
या तिघांनी मिळून २३ व २४ ऑगस्ट २०२० च्या दरम्यानच्या रात्री न्याती विंडचेंइम्स सोसायटीत शिरुन राज खिलनानी व नैला रिझवी यांच्या घराच्या दरवाजाचे लॉक तोडून आत प्रवेश केला व दोन्ही घरातील मिळून १ कोटी ३४ लाख ९५ हजार ६४१ रुपयांचे डायमंड व सोन्याचे दागिने आणि रोकड चोरुन नेली होती.
सीसीटीव्हीवरुन कोंढवा पोलिसांनी या तिघांपैकी मनिषकुमार याला अटक केली होती. पण, त्याच्याकडे चोरीचा माल मिळाला नाही. त्याचवेळी त्याच्या साथीदारांची माहिती मिळाली होती. त्यानुसार कोंढवा पोलिसांनी नवी दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाना पोलिसांना या चोरट्यांविषयी माहिती कळविली होती. दरम्यान, हरियाना पोलिसांनी राजेशकुमार आणि राकेशकुमार यांना पकडल्याची माहिती कोंढवा पोलिसांना मिळाली. त्यानंतर कोंढवा पोलिसांचे पथक तातडीने हरियानाला रवाना झाले. त्यांनी दोघांना हरियाना पोलिसांकडून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने दागिने मदनलाल कुम्हार या सराफाला विकल्याची माहिती दिली. सराफाला पोलिसांनी अटक करुन त्याच्याकडून ८ लाख १० हजार रुपयांची १८० ग्रॅमची सोन्याची लगड तसेच ९० हजार रुपयांची २१ ग्रॅमची लगड जप्त केली आहे. मनिषकुमार याने चोरीच्या पैशांमधून खरेदी केलेला ११ हजार रुपयांचा मोबाईलही जप्त करण्यात आला आहे. गुन्ह्यात वापरलेली कार व घरफोडीचे साहित्य जप्त केले आहे.
ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील, पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांच्यामार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक चेतन मोरे व त्यांच्या पथकाने केली.