डीएसकेंचा महत्वकांक्षी प्रकल्प असलेल्या 'ड्रीम सिटी'वर भुरट्या चोरांचा डल्ला!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2020 04:03 PM2020-11-24T16:03:33+5:302020-11-24T16:27:29+5:30
डीएसकेंना गुंतवणूकदारांचे पैसे बुडविल्या प्रकरणी अटक झाल्यानंतर हा प्रकल्प अडचणीत आला.
गणेश खंडाळे-
पुणे : कदमवाक वस्ती हद्दीत असलेल्या डीएसकेंचा 'ड्रीम सिटी' हा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प होता. परंतु डीएसकेंना गुंतवणूकदारांचे पैसे बुडविल्या प्रकरणी अटक झाल्यानंतर हा प्रकल्प अडचणीत आला. आज या प्रकल्पाला कोणी वाली नसल्यामुळे या ठिकाणी असलेल्या डीएसके इंटरनॅशनल कॉलेज ऑफ डिझाईन हे उध्वस्त झाले आहे. गेले वर्षभर एकही सुरक्षा रक्षक नाही. त्यामुळे भुरट्या चोरांना तर 'अलिबाबाची गुहा'च सापडल्यासारखे झाले आहे.
१६ फेब्रुवारी २०१८ रोजी डी.एस. कुलकर्णी यांना दिल्लीतून अटक करण्यात आली. तोपर्यंत येथे कामकाज सुरू होते. ड्रीम सिटीच्या पहिल्या टप्प्यात या ठिकाणी चार इमारती बांधण्यात आल्या होत्या. दोन इमारती विद्यार्थी शिक्षक यांच्या राहण्यासाठी हॉस्टेल्स आहेत. तर दोन इमारती या कॉलेजच्या आहेत. त्यासोबतच दोन प्रशस्त मैदाने आहेत.
परंतु गेले वर्षभर येथील कामकाज बंद आहे. याठिकाणचे सुरक्षारक्षकांनी लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वीच सेवा देणे बंद केले होते. त्यानंतर या ठिकाणी कोणतेही सुरक्षारक्षकन नाही. इमारतीमध्ये सर्वत्र काचांचा खच पडला आहे. दरवाजे तोडले आहेत. अत्यंत किंमती यंत्र सामग्री चोरीला गेली आहे. हॉस्टेलमधील अत्यंत दर्जेदार फर्निचच्या चोरीचे काम सध्या सुरू आहे.
डीएसके यांचा हा प्रकल्प पूर्ण झाला असता तर या ठिकाणी रोजगाराच्या संधी स्थानिक तरुणांना मिळाल्या असत्या रिंगरोडचे काम वेगाने झाले असते. परंतु डीएसकेच अटकेत असल्यामुळे आता या ठिकाणी कोणी वाली नाही. गुंतवणूक दारांचे पैसे पाण्यात गेले आहेत. या पायाभूत सुविधा भाड्याने जरी दिल्या असत्या तरी काही रक्कम गुंतवणूक दारांना परत मिळाली असती.
माझे घर या डिझाईन कॉलेजला लागूनच आहे. रात्रभर तोडफोडीचे आवाज येत असतात. परंतु यावर आता कोण नियंत्रण ठेवणार.
- अनिल टिळेकर,पंचायत समिती सदस्य
कदमवाकवस्तीचे माजी ग्रामपंचायत सदस्य राजू हिंगणे यांच्याशी बोलल्यानंतर त्यांनी धक्कादायक परिस्थिती सांगितली. जे टुकार गुटका खाऊन फिरत होते. असे काही या चोरीच्या पैशांवर गळ्यात सोन्याचे गोफ घालून फिरू लागले आहेत.