मांजरेवाडीत चोरट्यांचा कृषी पंपावर डल्ला, रात्रीत ८ पंप लांबविले; शेतकऱ्यांचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2023 02:16 PM2023-08-31T14:16:17+5:302023-08-31T14:16:28+5:30
चोरट्यांना पकडण्यात मात्र पोलिसांना अपयश येत असल्याचे चित्र दिसत आहे....
राजगुरुनगर (पुणे) : मांजरेवाडी पिंपळ (ता. खेड ) येथील शेतकऱ्यांचे भीमा नदीकाठावरील ( दि ३१ ) पहाटे रात्रीच्या सुमारास शेतकऱ्यांचे तब्बल ८ कृषी पंप चोरुन नेले. त्यामुळे शेतकऱ्यांचे सुमारे लाखो हजाराचे नुकसान झाले. गेल्या काही महिन्यापासून राजगुरुनगर शहरात व ग्रामिण भागात चोरी, घरफोडी, दुचाकी, शेतकऱ्यांचे कृषी पंप, चोरी जाण्याच्या घटनांमध्ये दिवसेदिवस वाढ झाली आहे. चोरट्यांना पकडण्यात मात्र पोलिसांना अपयश येत असल्याचे चित्र दिसत आहे.
खेड पोलिस ठाण्याच्या हद्दीत कृषी पंप व केबल चोरी, घरफोडी, मोटारसायकल चोरीच्या घटनामध्ये वाढ झाली आहे. शेतकऱ्यांचे कृषी पंप व इतर साहित्य चोरिला जात असून शेतकरी हतबल झाला आहे. मांजरेवाडी पिंपळ, मलघेवाडी या परिसरात भीमा नदीकाठी चोरट्यांनी धुमाकुळ घालत रात्रीच्या सुमारास नदीवर कृषी सिंचनासाठी बसविले विद्युत पंप चोरुन नेले. चोरट्यांनी विद्यूत पंपाचे पाईप कापून, केबल तोडून नासधुस केली. आधीच पुरेसा पाऊस नाही. पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना अहोरात्र राबावे लागते. त्यातच विद्युत पंपांच्या चोरीने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत.
खेड पोलिसांत शेतकऱ्यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार दिली असून कृषीपंपाचे संरक्षण कसे करायचे, असा शेतकऱ्यांसमोर प्रश्न निर्माण झाला आहे. काही महिन्यांपूर्वी मांजरेवाडी परिसरात कृषी पंप चोरिला गेले आहेत. या परिसरात पोलिसांनी गस्त घालावी चोरट्यांचा शोध घ्यावा अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य अशोक मांजरे, प्रविण मांजरे, माजी उपसरपंच सतीश मलघे, राहूल मलघे, सागर लालासाहेब मांजरे, बाबाजी मांजरे यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.
मांजरेवाडी पिंपळ परिसरात गेल्या तीन वर्षापासून मोटार चोरीचे सत्र सुरू आहे याचा तपास अजुन लागला नसून चोरट्यांचे फावले आहे कधी वीज भारनियमन तर कधी नदीत पाणीच नाही, त्यात विद्युत मोटारी चोरी होत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे.
- मनोहर मांजरे. ( शेतकरी, मांजरेवाडी पिंपळ ता खेड)
नदीकाठ परिसरात रात्रीच्या वेळी कोणी नसल्याने विद्युत पंपावर चोरटे डल्ले मारत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होतेच तसेच वेळेवर पिकांना पाणी देता येत नसल्याने पिके ही हातून जात आहे. या परिसरात रात्रीची पोलिसांनी गस्त घालावी.
- सतीश मलघे (माजी उपसरपंच, मलघेवाडी ता. खेड )