Pune: वरवंडमध्ये सराफाचे दुकान चोरट्यांनी फोडले; ७७ लाख १० हजारांचा मुद्देमाल चोरी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2023 06:01 PM2023-07-19T18:01:48+5:302023-07-19T18:03:26+5:30
सराफाचे दुकान फोडून चोरट्यांनी ७७ लाख १० हजारांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे उघड...
वरवंड (पुणे) : येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील ए. बी.सराफ हे भरचौकातील सराफाचे दुकान फोडून चोरट्यांनी ७७ लाख १० हजारांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे उघड झाले.
ए.बी. सराफ हे दुकानाचे पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी शटर, लोखंडी ग्रील, आतील लोखंडी तिजोरी फोडून त्यातील सोने व चांदीच्या मौल्यवान वस्तू चोरून नेल्याचे उघड झाले आहे. जवळपास रोख रक्कम (१.५० लाख) दीड लाख रुपये, ( ४१ लाख २३ हजार) एक्केचाळीस लाख तेवीस हजार रुपयांचे सोन्याचे दागिने, ( ३ लाख ५० हजार) तीन लाख पन्नास हजार सोन्याचे दागिने, (३० लाख )तीस लाख किमतीचे चांदी ५० किलो, सत्याहत्तर हजार चांदीचे मोडीचे दागिने २ किलो व १० हजार रुपयांची सीसीटीव्ही कॅमेरा मशीन असा एकूण ७७ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक हेमंत शेंडगे यांनी दिली आहे.
चोरट्यांनी भर चौकात चोरी केल्याने वरवंड गावातील नागरिक भयभीत झाले आहेत. दुकानातील सीसीटीव्ही मशीन चोरटे घेऊन पसार झाले आहेत व बाहेरील सीसीटीव्हीवर सिल्त्हर कलरचा स्प्रे मारला आहे. त्यामुळे पोलिसांना इतरत्र पाहणी करावी लागली. ग्रामपंचायतीचे काही सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत.
घटनेची माहिती मिळताच यवत पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक हेमंत शेंडगे, सहायक पोलिस निरीक्षक नागरगोजे यांनी धाव घेतली तसेच बारामती विभागाचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक आनंद भोईटे, दौंड उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्निल जाधव, स्थनिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.
वरवंड ही दौंड तालुक्यातील मोठी बाजारपेठ मानली जाते. मात्र, वरवंड ग्रामपंचायतीची उदासीनता यावेळी दिसून आली. कारण वरवंड ग्रामपंचायतीने लावलेले बरेच सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचे समोर आले आहे. तसेच, गावामध्ये शिक्षणाच्या दृष्टीने विद्यार्थी मोठ्या प्रमाणात गावात ये-जा करत असतात. सुरक्षेच्या दृष्टीने गावातील दुकानदारांनीही सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे गरजेचे आहे.