जुन्नर तालुक्यातील कांदळीत विद्युत रोहित्र चोरट्यांनी फोडले; शेतकऱ्यांपुढे उभे नवे संकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 18:44 IST2025-02-25T18:43:22+5:302025-02-25T18:44:19+5:30

पोलिसांनी चोरांचा शोध घेऊन कायमचा बंदोबस्त करण्याची गरज आहे

Thieves broke electric motor in Kandali in Junnar taluka Farmers face a new crisis | जुन्नर तालुक्यातील कांदळीत विद्युत रोहित्र चोरट्यांनी फोडले; शेतकऱ्यांपुढे उभे नवे संकट

जुन्नर तालुक्यातील कांदळीत विद्युत रोहित्र चोरट्यांनी फोडले; शेतकऱ्यांपुढे उभे नवे संकट

वडगाव कांदळी: कांदळी (ता. जुन्नर) येथील कुकडी नदीवरील( बढे सर्विस स्टेशन जवळ) शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या उपसा जलसिंचन योजनेला पाणीपुरवठा करण्यासाठी मोटारींसाठी वापरत असलेले विद्युत रोहित्र सोमवारी (दि.२४) रात्री अज्ञात चोरट्याने फोडून त्यातील तांब्याच्या तारा व इतर साहित्य चोरून नेले आहे. रोहित्रातील ऑइल गळून गेले असून इतर लोखंडी साहित्य इतरत्र पडले आहे यामध्ये महावितरणचे अंदाजे दीड लाख रुपये नुकसान झाले आहे. 

याबाबतची सविस्तर माहिती अशी की ,नगदवाडी ,वडगाव कांदळी येथील शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी शेतकऱ्यांनी कांदळी येथील कुकडी नदीच्या बंधाऱ्यावरून पाच ते सहा किलोमीटर पाईपलाईन केली आहे. विद्युत मोटारींच्या साह्याने नदीपात्रातून पाणी उपसा केला जातो. नदीच्या काठावर असणारे हे रोहित्र चोरट्याने फोडून त्यातील तांब्याच्या तारा व इतर साहित्य लंपास केले आहे. मंगळवारी (दि. २५) पहाटे पाच वाजता विद्युत पंप सुरू न झाल्याने शेतकरी नदीकडे गेले असता पहाटे हा प्रकार उघडकीस आला .

शेतकरी अडचणीत

कुकडी नदी वरून मुख्यतः कोरडवाहू शेतीला पाणीपुरवठा व्हावा म्हणून सात ते आठ शेतकरी एकत्र येऊन उपसा जलसिंचन योजना राबविल्या जात आहे.  विद्युत रोहित्र फोडल्याने पिके जळून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. या भागासाठी जलसिंचनाची दुसरी सोयी नसल्याने शेतकऱ्यांनी भांडवली खर्च घालून पाण्याअभावी पिके जळून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. महावितरणने तात्काळ रोहित्र बसवले तर पिके वाचतील नाहीतर शेतकऱ्यांची पूर्ण वर्षाची मेहनत वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. महावितरण ने तात्काळ दुसरे रोहित्र देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

तांब्याच्या तारांची  चोरी नित्याचीच

 कुकडी नदीकिनाऱ्यावर असणाऱ्या विद्युत मोटारींची केबल चोरी ही नित्याचीच बाब आहे. त्यामुळे दरवर्षी एक वीज पंप धारकास १० ते १५ हजाराचा भुर्दंड बसत आहे. त्यातच आता विद्युत रोहित्र फोडण्याचा प्रकार झाल्याने शेतकऱ्यांपुढे नवीन संकट तयार झाले आहे. पोलिसांनी चोरांचा शोध घेऊन कायमचा बंदोबस्त करण्याची गरज आहे.

Web Title: Thieves broke electric motor in Kandali in Junnar taluka Farmers face a new crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.