घरात घुसून चोरट्यांनी हात पाय बांधून ६३ लाख रुपयांचा ऐवज लुटला; बारामतीत मोठी खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2023 07:41 PM2023-04-23T19:41:05+5:302023-04-23T19:41:13+5:30
घटनेमुळे चोरीच्या प्रकारात वाढ झाल्याचे स्पष्ट झाले असून पोलिसांनी तातडीने आरोपींच्या मुसक्या आवळणे गरजेचे
बारामती: बारामती शहरात शनिवारी(दि.२२) रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घरात घुसून चोरट्यांनी हात पाय बांधून ५५ लाख रुपयांच्या रोख रकमेसह सोन्या चांदीचे दागिने असा सुमारे ६३ लाख १५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी देवकाते नगर मधील देवकाते पार्क येथे राहणाऱ्या तृप्ती सागर गोफणे यांनी बारामती तालुका पोलिसांकडे फिर्याद दिली असून या घटनेने बारामतीत मोठी खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रात्रीच्या साडेआठ वाजण्याच्या सुमारास तृप्ती गोफणे यांच्या घरात तीन अज्ञात चोरटे घुसले. त्यावेळी गोफणे ह्या एकट्याच घरी होत्या चोरट्यांनी गोफणे यांचे हात पाय बांधून घरातील ऐवज चोरून नेला.
यामध्ये जमीन खरेदीसाठी घरात आणून ठेवलेली तब्बल ५५ लाख तीस हजार रुपयांची रोख रक्कम, ६ लाख रुपयांची सोन्याची चेन, ९० हजार रुपयांचे मिनी गंठण, १८ हजार रुपयाची सोन्याची चेन, १२ हजार रुपयांचे कानातील दागिने, १८ हजार रुपयांची अंगठी, ८ हजार रुपयांचा ओप्पो कंपनीचा मोबाईल, २५ हजार रुपयांचा ऍप्पल कंपनीचा मोबाईल असा ऐवज चोरट्यांनी लुटून नेला आहे.
याप्रकरणी गोफणे यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली असून, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी तसेच तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांनी घटनास्थळी भेट दिली. बारामती शहराच्या रात्रीच्या वेळी सव्वा आठ वाजता अशा प्रकारची धाडसी चोरी झाल्याने परिसरात मात्र खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे चोरीच्या प्रकारात वाढ झाल्याचे स्पष्ट झाले असून पोलिसांनी तातडीने आरोपींच्या मुसक्या आवळणे गरजेचे आहे.