Pune: चोरी करून चोरट्यांनी अख्ख्या गावाचा वीजपुरवठा केला खंडित; पुणे जिल्ह्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2023 16:04 IST2023-06-14T16:04:19+5:302023-06-14T16:04:44+5:30
चोरट्यांनी वीजपुरवठा खंडित केल्याने रात्रभर गाव अंधारात बुडाले होते...

Pune: चोरी करून चोरट्यांनी अख्ख्या गावाचा वीजपुरवठा केला खंडित; पुणे जिल्ह्यातील घटना
मंचर (पुणे) : बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने दागिने चोरून नेले. ही घटना आंबेगाव तालुक्यातील कळंब गावातील शिरामळा वस्तीवर घडली. चोरट्यांनी वीजपुरवठा खंडित केल्याने रात्रभर गाव अंधारात बुडाले होते.
कळंब येथील शिरामळा वस्तीवरील स्वप्निल मुरलीधर भालेराव यांच्या बंदिस्त घराचे कुलूप कडी कोयंडा अज्ञात चोरट्यांनी तोडून घरामध्ये प्रवेश केला. त्यावेळी कपाटाच्या आतील लाॅकर तोडून सामान अस्ताव्यस्त करून १ सोन्याची नथ आणि पायातील पैंजण असा एकूण पाच ते सहा हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. यासाठी अज्ञात चोरट्यांनी प्रथम शिरामळा येथील वीजवाहक खांबाचा ताण कट करून विद्युत पुरवठा खंडित करण्याचा प्रयत्न केला. त्यादरम्यान वायर तुटून रात्री १ वाजता विद्युत पुरवठा खंडित झाला. तसेच खांबाचा ताण तुटल्यामुळे बहुतांशी तारा एकमेकांना संपर्क होऊन अनेक ठिकाणी वायरी तुटल्या. त्यामुळे महावितरणच्या सर्वच कर्मचाऱ्यांना नाहक मनस्ताप सहन करून विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी जवळपास १२ ते १५ तासांचा कालावधी लागला.
कळंब गावातील नागरिक रात्रभर अंधारात होते. तसेच यामुळे सर्व नागरिकांना उकाडा जाणवला आणि डास चावल्याने त्यांचा नाहक त्रास सहन करावा लागला. चोरट्यांमुळे महावितरणला व ग्राहकांना नाहक मनस्ताप झाल्याचे कळंब येथील महावितरणचे शाखा व्यवस्थापक माधव मुंडे यांनी सांगितले. दुपारी तीन वाजता वीजपुरवठा सुरळीत करण्यात यश आले होते.