पुण्यात गणपती विसर्जन मिरवणुकीत चोरांचा सुळसुळाट; मोबाईल, सोन चोरीला गेल्याच्या अनेक तक्रारी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2017 06:20 PM2017-09-06T18:20:47+5:302017-09-06T18:28:03+5:30
गणेश विसर्जन मिरवणूकीत मोबाईल आणि सोनसाखळी चोरी करणाऱ्या टोळ्यांनी चांगलंच डोकं वर काढलं होतं.
पुणे, दि. 6 - गणेश विसर्जन मिरवणूकीत मोबाईल आणि सोनसाखळी चोरी करणाऱ्या टोळ्यांनी चांगलंच डोकं वर काढलं होतं. भाविकांच्या नकळतपणे मोबाईल लंपास करण्याच्या प्राथमिक अंदाजानुसार जवळपास दीड हजार घटना घडल्या. मोबाईल चोरीची तक्रार नोंदविण्यासाठी गेलेल्या नागरीकांना ऑनलाईन तक्रार करण्यास सांगून पोलीस आपली जबाबदारी झटकत होते. विशेष म्हणजे पुणे पोलिसांच्या संकेतस्थळावर सुरू करण्यात आलेल्या ‘लॉस्ट अँड फाऊंड’ चा सर्व्हर गेल्या दहा दिवसांपासून डाऊन आहे. याबाबत पोलीस स्थानकांना माहिती नसल्याचं दिसून आलं. पोलिसांनी चोरीच्या तक्रारी नोंदविण्यास केलेली टाळाटाळ आणि ऑनलाईन सर्व्हर डाऊन असल्यामुळे अनेक नागरीकांना तक्रारी नोंदवताच आल्या नाहीत.
गणपती विसर्जनाच्या दिवशी पाऊस नसल्याने भाविक मोठ्या संख्यने विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी रस्त्यांवर थांबले होते. सकाळपासूनच मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी लक्ष्मी आणि टिळक रस्त्यासह शहराच्या मध्यवस्तीतील प्रमुख रस्त्यांवर गणेशभक्तांची गर्दी उसळली होती. या गर्दीमध्ये आबालवृद्धांचाही सहभाग होता. तरुण-तरुणी, आयटीयन्स, महाविद्यालयीन तरुणांसह अनेक जण कुटुंबासोबत मिरवणूक पाहण्यासाठी रस्त्यांवर उभे होते. या गर्दीचा फायदा घेण्यासाठी चोरांच्या टोळ्या मिरवणूकीत सक्रिय झाल्या होत्या. चोरट्यांनी अनेकांचे मोबाईल लंपास केले. मानाच्या विसर्जन मिरवणूकींसह रात्री उशीरापर्यंत गर्दीचा ओघ कायम होता. बेलबाग चौक, लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता आदी प्रमुख रस्त्यांवर चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला. खिशातले मोबाईल चोरटे शिताफीने चोरत होते. गर्दीतून बाहेर आल्यानंतर कित्येकांना आपला मोबाईल चोरीला गेल्याचं लक्षात येत होतं.
मोबाईलबरोबरच महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि सोनसाखळ्या चोरीच्या घटनाही पाहायला मिळाल्या. अनेक जण पोलीस मदत केंद्रावर जाऊन मोबाईल चोरी झाल्याच्या तक्रारी देत होते. मात्र पोलीस ठाण्यातील कर्मचारी नागरीकांची मोबाईल चोरीची तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ करीत होते. पुणे पोलिसांनी सुरू केलेल्या ‘लॉस्ट अँड फाऊंड’ या पोर्टवर ऑनलाईन एफआयआर नोंदविण्यास सांगून नागरीकांना पिटाळून लावत होते. तरीही काही जणांनी पोलिसांशी हुज्जत घालून तक्रार नोंदवून घेण्यास भाग पाडलं. दरम्यान पोलीस आयुक्तालयातील महिला कर्मचा-यांनी 28 ऑगस्ट पासून ‘लॉस्ट अँड फाऊंड’ पोर्टलचा सर्व्हर डाऊन असल्याचं सांगितलं. हा सर्व्हर असाच डाऊन राहीला, तर नागरीकांनी केलेल्या तक्रारी कधी संबंधित पोलीस ठाणे आणि उपायुक्तांना मिळणार? आणि कधी कारवाई केली जाणार? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.