Pune | खेड तालुक्यात चोरट्यांचा कृषी पंपावर डल्ला; रात्रीत पाईप कापून लांबविले पाच पंप
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2023 07:25 PM2023-01-09T19:25:47+5:302023-01-09T19:27:09+5:30
चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना अपयश...
राजगुरुनगर (पुणे) : कोहिनकरवाडी (ता. खेड) येथील शेतकऱ्यांचे चासकमान धरणाच्या कालव्यावरील चार कृषी पंप चोरीला गेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे सुमारे ५० हजाराचे नुकसान झाले. गेल्या काही महिन्यांपासून राजगुरुनगर शहरात व ग्रामीण भागात चोरी, घरफोडी, दुचाकी, शेतकऱ्यांचे कृषी पंप, चोरी जाण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. चोरट्यांना पकडण्यात मात्र पोलिसांना यश येत नसल्याचे चित्र दिसत आहे.
तालुक्यात कृषी पंप व केबल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. शेतकऱ्यांचे कृषी पंप व इतर साहित्य चोरीला जात असून शेतकरी हतबल झाला आहे. कोहिनकरवाडी - मुळेवस्ती येथील शेतकरी रामदास बबन कोहीनकर ( रा. कोहीनकरवाडी ता. खेड ) यांनी शेतजमिनीला पाणी देण्यासाठी चासकमान धरणाच्या डाव्या कालव्यावर कृषी पंप बसविला होता. (दि. ८) रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी चोरून नेला. कोहिनकर या शेतकऱ्यांचे दहा हजारांचे नुकसान झाले.
तसेच याच परिसरातील कॅनॉलवर बसविलेल्या संतोष विठ्ठल कोहीनकर, बाळासाहेब बबन कोहीनकर, फक्कड बबन कोहीनकर, सुदाम रामभाउ कोहीनकर या शेतकऱ्यांचेही मोटार चोरट्यांनी चोरून नेल्या. या शेतकऱ्यांचे सुमारे चाळीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच मांजरेवाडी येथील शेतकरी किसन रामभाऊ मांजरे या शेतकऱ्यांने भीमानदीकाठी असलेला कृषी पंप पाईप कापून चोरट्यांनी चोरून नेला आहे.