‘पीएमपी’त चोरांचा सुळसुळाट! डुलकी लागताच खिसा कापला, महिलेचेही दागिने लंपास
By नितीश गोवंडे | Published: May 3, 2024 07:49 PM2024-05-03T19:49:27+5:302024-05-03T19:51:51+5:30
दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दाखल चोरीच्या गुन्ह्यांमध्ये ८५ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याप्रकरणी तक्रारी देण्यात आल्या आहेत...
पुणे : शहरात सध्या चोरीचे प्रमाण वाढले असून, पीएमपी प्रवासादरम्यान देखील सातत्याने चोरीच्या घटना घडत आहेत. दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दाखल चोरीच्या गुन्ह्यांमध्ये ८५ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याप्रकरणी तक्रारी देण्यात आल्या आहेत.
पहिल्या घटनेत कुलदीप लक्ष्मण जाधव (२४, रा. हिंजवडी) हा युवक गुरूवारी (ता. २) छत्रपती संभाजीनगर येथून पुण्यात एसटीने आला. वाकडेवाडी बस स्थानकावरून उतरून तो पायी सिमला ऑफिसजवळील पीएमपी बसस्थानकावर आला. यानंतर जाधव पीएमपीमध्ये बसला, मात्र बस सुटण्यास वेळ असल्याने तेथेच बसून राहिला. प्रवासामुळे थकलेला असल्याने कुलदीप जाधव याला झोप लागली, यावेळी त्याच्या पँटच्या खिशातील मोबाइल आणि सोबत असलेली कपड्यांची सॅक असा २० हजार १५० रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोराने चोरून नेला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सपकाळे करत आहेत.
दुसऱ्या घटनेत दापोडी येथील रहिवासी सारिका उमेश उजागरे (३५) या गुरूवारी (ता. २) वाघोली ते निगडी प्रवासासाठी वाघोलीतून पीएमपीमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत चोराने त्यांच्या पर्समधील ६५ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दागिने चोरले. याप्रकरणी लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस कर्मचारी सांगडे करत आहेत.