जैन साधूच्या वेशात चोरी करणारा चोरटा जेरबंद
By नितीश गोवंडे | Published: December 9, 2024 05:08 PM2024-12-09T17:08:21+5:302024-12-09T17:08:39+5:30
एका मंदिरात चोरी करताना, तो सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला अन् अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
पुणे : जैन साधकांसारखी वस्त्रे परिधान करून तो मंदिरात प्रवेश करत होता. पूजा-अर्चा केल्याचा बहाणा करून संधी मिळताच मंदिरातील किमती ऐवज चोरी करून निघून जायचा. मात्र, त्याचा हा बनाव स्वारगेट पोलिसांच्या नजरेत आला. अशाच एका मंदिरात चोरी करताना, तो सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला अन् अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
नरेश आगरचंद जैन (४८, बॉम्बे चाळ, टँक गिरगाव व्ही. पी. रोड, मुंबई) असे या चोरट्याचे नाव आहे. नरेश हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याने यापूर्वी अशाच प्रकारे घाटकोपर, वाई, चिखली, डोंबिवली या परिसरात आठ ते दहा ठिकाणी मंदिरांमध्ये चोरी केल्याचे पुढे आले. पुण्यात देखील त्याने यापूर्वी मंदिरात चोऱ्या केल्या, मात्र तक्रार न आल्यामुळे त्याचा उलगडा झाला नाही. नरेश याच्याकडून चोरी केलेला देवाचा मुकुट, सोन्याची चैन, असा ४ लाख २० हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
१५ नोव्हेंबर रोजी जय पारेख (रा. सिटीवूड सोसायटी, पुनावाला गार्डनसमोर) यांच्या घरातील जैन मंदिरात चोरी झाली होती. चोरट्याने जैन मंदिरातील सोन्याचा मुकुट आणि सोनसाखळी चोरी केली होती. याबाबत पारेख यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, याचवेळी स्वारगेट परिसरातील तीन ते चार जैन मंदिरात देखील चोरीचा प्रयत्न झाला होता.
७०० सीसीटीव्ही कॅमेरे तपासले अन् गुन्ह्याचा छडा लावला..
चोरट्याकडून जैन मंदिरात चोऱ्या केल्या जात असल्यामुळे पोलिसांसमोर चोरट्याला पकडण्याचे आव्हान निर्माण झाले होते. त्यासाठी पोलिसांनी शहरातील तब्बल सातशे सीसीटीव्ही कॅमेरे तपासले, खबऱ्यांचे नेटवर्क कामाला लावले. प्रत्येक शक्यता गृहीत धरून तपासाला सुरुवात केली. अखेर एका जैन मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये नरेशचा कारनामा कैद झाल्याचे दिसून आले. पांढरी वस्त्रे परिधान करून पूजा-अर्चा केल्यानंतर संधी मिळताच दागिने चोरी करताना तो दिसून आला. दरम्यान, पोलिस हवालदार सागर केकाण यांना नरेश मुंबई येथे वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने त्याला ताब्यात घेतले.
त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने आर्थिक अडचणीतून चोरी केल्याचे सांगितले. ही कामगिरी पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलिस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक युवराज नांद्रे, पोलिस उपनिरीक्षक संतोष तानवडे, पोलिस कर्मचारी शंकर संपते, कुंदन शिंदे, श्रीधर पाटील, दिनेश भांदुर्गे, रफीक नदाफ, सतीश कुंभार यांच्या पथकाने केली.
जैन मंदिरात जैन साधूच्या वेशात चोरी करणाऱ्या चोरट्याला स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे. तो सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर यापूर्वी देखील, असे चोरीचे गुन्हे दाखल आहेत. स्वारगेट परिसरातील एका जैन मंदिरात त्याने चोरी केली होती. - युवराज नांद्रे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, स्वारगेट पोलिस ठाणे