चोरट्यांचा नवा फंडा! पैसे बाहेर येतात त्याठिकाणी पट्टी, एटीएममध्ये छेडछाड करणाऱ्या दोघांना अटक
By भाग्यश्री गिलडा | Published: August 4, 2023 12:43 PM2023-08-04T12:43:25+5:302023-08-04T12:43:33+5:30
पैसे अडकून राहिले असतील, नंतर ते रिफंड होतील असे कस्टमरला वाटते
पुणे : धनकवडी भागातील एचडीएफसी बँकेच्या एटीएममध्ये छेडछाड करून पैसे काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी गुरुवारी (दि. ०२) धर्मेंद्र श्रीशिवलाल (वय ३०) आणि सोनूकुमार जगदेव सरोज (दोघेही रा. उत्तरप्रदेश) यांना अटक करण्यात आली आहे.
रामचंद्र मल्लकार्जुन जाधव (वय ३८, रा. बिबवेवाडी) यांनी पोलिसांना फिर्याद दिली आहे.
फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे जाधव हे पैसे काढण्यासाठी एचडीएफसी बँकेच्या एटीएममध्ये गेले होते. सगळा तपशील टाकून झाल्यावर एटीएममधून ६ हजार रुपये नकद कलेक्ट करा असा मेसेज दर्शवल्यावर जाधव यांनी काही वेळ वाट पहिली मात्र कॅश आली नाही. बहुतेक एटीएममध्ये पैसे संपले असावेत आणि बँकेत पुन्हा जमा झाले असावेत असा विचार करून जाधव माघारी परतले. मात्र बँकेत पैसे जमा झालेच माही आणि जाधव यांनाही मिळाले नाही तेव्हा सीसीटीव्ही तपासून पहिले असता शटर टेम्परिंग करून फसवणूक केल्याचे लक्षात आले. बँकेची आणि खातेधारकाची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून त्यांना शनिवार (दि. ०५) पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
शटर टेम्परिंग करून केली फसवणूक
दोघा आरोपींनी एटीएममधून पैसे बाहेर येतात त्या ठिकाणी पट्टी टाकली होती. पैसे आले कि ते तिथेच अडकून राहतात आणि ग्राहकाला भेटत नाही. पैसे आले नाही म्हणजे रिफंड होतील असे कस्टमरला वाटते. आणि कस्टमर तेथून निघून गेल्यावर हे दोघे ती पट्टी काढून पैसे काढून घेतात. - धीरज गुप्ता, पोलीस उपनिरीक्षक, भारती विद्यापीठ पोलीस ठाणे