पुण्यात व्यावसायिकाचे घर चोरट्यांनी फोडले; ३८ तोळे सोने, ५ किलो चांदीचे दागिने पळविले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2020 08:24 PM2020-09-16T20:24:37+5:302020-09-16T20:25:39+5:30
हे व्यावसायिक काही कामानिमित्त बाहेरगावी गेले असताना चोरट्यांनी डाव साधला.
पुणे : वाकडेवाडी येथील एका व्यावसायिकाच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी तब्बल २१ लाख २० हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. त्यात ३८ तोळे सोन्याचे दागिने, ५ किलो चांदीचे दागिने, साहित्य आणि ३ लाख रुपये रोख यांचा समावेश आहे.
याप्रकरणी प्रशांत आमिनभावी (वय ५०, रा. वाकडेवाडी) यांनी खडकी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना वाकडेवाडी येथील भाले इस्टेट येथे १४ व १५ सप्टेंबर दरम्यान घडली आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, आमिनभावी हे व्यावसायिक असून ते कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. त्यामुळे सोमवारी त्यांचे घर बंद होते. चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप उचकटून आत प्रवेश केला. बेडरुमच्या कपाटातील सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा २१ लाख २० हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. मंगळवारी दुपारी प्रशांत आमिनभावी हे परत आल्यानंतर त्यांना कुलूप तुडलेले दिसले. त्यांनी घरात जाऊन पाहणी केल्यावर चोरी झाल्याचे लक्षात आले. या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे, पोलीस निरीक्षक शफिल पठाण यांनी भेट देऊन पाहणी केली. खडकी पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.