चाेरट्यांनी थेट एटीएमच नेले चाेरुन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2019 07:11 PM2019-12-15T19:11:39+5:302019-12-15T19:12:29+5:30
चाकणमध्ये चाेरट्यांनी एटीएम मशीनच चाेरुन नेल्याची धक्कादायक घटना समाेर आली आहे.
चाकण : खराबवाडी (ता. खेड) येथील तळेगाव चाकण महामार्गालगतच्या सारा सिटी शेजारील साई निवास बिल्डिंगमधील अॅक्सिस बँकेच्या एटीएममधील तब्बल ९ लाख ७२ हजार ३०० रुपये एटीएम मशिनसह चोरट्यांनी लंपास केले. ही घटना रविवारी (दि.१५) सकाळी उघडकीस आली.
सूरज दत्तात्रय काचळे (वय २८, रा. सारा सिटी, खराबवाडी, चाकण) यांनी या प्रकरणी म्हाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण जवळील खराबवाडी औद्योगिक वसाहतीतील सारा सिटीच्या गेटशेजारील साई निवास बिल्डिंगमध्ये अॅक्सिस बँकेचे एटीएम आहे. या ठिकाणी नेहमीच पैसे काढण्यासाठी लोकांची वर्दळ असते, त्यामुळे या एटीएम मशिनमध्ये लाखो रुपयांची रक्कम भरलेली असते.
रविवारी रात्री १.३० ते २ च्या दरम्यान चोरट्यांनी विकानेर कंपनीचे अॅक्सिस बँकेचे संपूर्ण एटीएम मशिन कापून रोकडसह पांढऱ्या रंगाच्या मोटारीत गाडीतून चोरून नेले. या मशिनमध्ये १०० रुपयांच्या ३ नोटा, २०० रुपयांच्या ७४० नोटा, तर ५०० रुपयांच्या १६४८ असे ९ लाख ७२ हजार ३०० रुपये रोख तर ३ लाख ५० हजार रुपयांचे मशिन असा १३ लाखांचा एवज लंपास केला. या प्रकरणी म्हाळुंगे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक बालाजी सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रमोद क्षीरसागर करीत आहेत.
एटीम मशिनची सुरक्षा रामभरोसे
चाकण व परिसरात विविध बँकेचे शेकडो आसपास एटीएम मशिन आहेत. बहुतांश एटीएम मशिन सेंटरमध्ये सुरक्षारक्षक नाहीत. फक्त सीसीटीव्हीच्या भरवशावरच जनतेचे लाखो रुपये ठेवले जातात. याबाबत संबंधित बँक किती जागरूक आहे, हे दिसून येते. एटीएम मशिनच्या सुरक्षेसाठी चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण पवार यांनी मागील महिन्यात सर्व बँक अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तशा सूचना केल्या होत्या. मात्र, बँकेकडून अजूनही सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्यात आल्या नाहीत, हे आजच्या चोरीवरून उघड झाले आहे.