यवतमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:10 AM2021-07-17T04:10:38+5:302021-07-17T04:10:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क यवत : यवतमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी पुन्हा एकदा धुमाकूळ घातला. चार वेगवेगळ्या ठिकाणी घरफोडी करून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
यवत : यवतमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी पुन्हा एकदा धुमाकूळ घातला. चार वेगवेगळ्या ठिकाणी घरफोडी करून सुमारे साडेचार लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. तर एका वयस्कर व्यापाराला घराचा कोयंडा तोडून मारहाण केली.
गुरुवारी (दि. १५) रात्री बारानंतर मध्यरात्रीच्या सुमारास चोरांनी मुख्य बाजारपेठ व गावठाण भागात तीन ठिकणी घरफोड्या केल्या. तर स्टेशन रोड परिसरातील एक बंद घराचा दरवाजा तोडून तेथील सामानाची उचकापाचक केली.
गावठाणमधील बालाजी सुपर मार्केट रिटेल व न्यू बालाजी सुपर मार्केट होलसेल अशी दोन्ही दुकाने चोरांनी मागच्या दरवाजांची कुलपे तोडून लुटली. याबाबत दुकानाचे मालक राजेंद्र गणपत मालभारे यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. मालभारे यांच्या दुकानाच्या बाजूच्या खोलीत त्यांचे सोन्या चांदीचे दागिने होते. ते देखील चोरांनी हुडकून काढून पळविले. चोरांनी तीन तोळे वजनाचे सोन्याचे मणी मंगळसूत्र, १० देवाचे चांदीचे शिक्के, कमरेचा छल्ला, चांदीचे ब्रेसलेट, न्यू बालाजी सुपर मार्केटमधील १ लाख ५० हजारांची रोख रक्कम तर, बालाजी सुपर मार्केटमधील १ लाख ३५ हजार रुपयांची रोख रक्कम, असा एकूण ४ लाख १५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.
चोरांनी मुलाणी कुटुंबाचे बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. मात्र, त्यांना तेथे काही हाती लागले नाही. यानंतर त्यांनी मुख्य बाजारपेठच्या बाजूला असलेल्या महाराष्ट्र बेकरीकडे मोर्चा वळविला. बेकरीच्या मागच्या बाजूला असलेल्या दरवाजा चोरांनी तोडून आत प्रवेश केला. या वेळी घरात असलेले मुबारक शेख यांनी आरडाओरडा करताच त्यांना मारहाण केली. या वेळी त्यांच्या छातीवर देखील लोखंडी कटावणीने मारहाण केली. मात्र, त्यांच्या आवाजाने घरातील जागे झाल्याचा सुगावा लागताच चोर घराबाहेर आले. मात्र, जाताना आरामात चालत गेल्याचे मुबारक शेख यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
विद्या विकास मंदिर विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक नारायण करळे यांचे यवत स्टेशन रोड परिसरातील बंद घर फोडून त्यातील सामानाची देखील चोरांनी उचकापाचक केली. मात्र, तेथे चोरांना कसलाही ऐवज हाती लागला नाही.