‘लमाण’ च्या न झालेल्या अनुवादाची गोष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2019 06:00 AM2019-12-15T06:00:00+5:302019-12-15T06:00:08+5:30
अनेक प्रतिभावान अभिनेत्यांना त्याचे आकर्षण
राजू इनामदार
पुणे: ‘लमाण’ हे प्रसिद्ध अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचे आत्मचरित्र. आपल्या अभिनयाचा सुरवातीपासूनचा प्रवासच त्यांनी यात उलगडून दाखवला आहे. अनेक प्रतिभावान अभिनेत्यांना त्याचे आकर्षण आहे. तन्वीर पुरस्कार स्विकारताना झालेल्या अनौपचारिक गप्पांमध्ये नसिरुद्दीन शहा यांनी ‘बहुदा त्याचा अनुवाद होत आहे’ असे सांगितले. त्याचा शोध घेतला असता मराठीतील ही उत्तम कलाकृती अनेकांच्या इच्छेनंतरही अजून अनुवादाच्या जवळ पोहचली नसल्याचे आढळले.
‘पत्नी रत्ना हिने ‘लमाण’ या मराठीतील शब्दाचा अर्थ उलगडून दाखवल्यावर मी त्याच्या प्रेमातच पडलो. डॉ. लागू हे अभिनयश्रेष्ठ आहेत. त्यांनी ‘लमाण’ मध्ये काय लिहिले असेल याची उत्सुकता आहे, पण ते मराठीतून असल्यामुळे वाचता येत नाही. त्याचा बहुदा हिंदी व इंग्रजीत अनुवाद होत आहे’ असे शहा पुण्यातच झालेल्या तन्वीर पुरस्कार कार्यक्रमात म्हणाले. ‘कोण करत असेल अनुवाद?’ या उत्सुकतेपोटी त्याचा शोध घेतला. त्याची सुरूवात दीपा लागू यांच्यापासूनच झाली.
त्यांनी ‘अहो, असे म्हणाले का नसिरुद्धीन शहा?’ म्हणून प्रतिप्रश्न केला. ‘आम्हाला माहिती नाही कोणी करत असेल तर, कोणी तशी विचारणाही आमच्याकडे केलेली नाही किंवा माहितीही दिलेली नाही’ असे त्या म्हणाल्या, मात्र ‘अनुवाद व्हायला हवा, कोणीतरी पुढे येऊन हे काम करायला हवे, श्रीरामने त्याच्या आयुष्यातील घटनांबद्दल सांगतानाच अभिनयासंबधी ‘लमाण’ केलेले विवेचन उत्कृष्ट आहे, ते सर्वांसमोर यायला हवे’ असे मत त्यांनी व्यक्त केले. जाताजाता यासंबधी काही सुरू असेल तर पॉप्यूलर प्रकाशचे (लमाण चे प्रकाशक) रामदास भटकळ यासंबधी काही सांगू शकतील असेही त्यांनी सांगितले.
भटकळांनाही याची माहिती नव्हती. ‘मी आता व्यवसायातून निवृत्त झालो आहे, लेखनकाम करत असतो. त्यामुळे काहीच माहिती नाही’ असे ते म्हणाले. ‘तुमचेच, तुम्ही स्वत: सर्व प्रक्रिया करून तयार केलेले पुस्तक आणि तुम्हालाच कसे माहिती नाही असे विचारून त्यांना बोलते केले तर म्हणाले, ‘‘त्यात डॉ. लागू यांनी अभिनयासंबधीचा त्यांचा जो काही अभ्यास मांडला आहे तो या क्षेत्रात काम करणाºयांना नक्कीच दिशादर्शक ठरेल. त्यासाठी तरी अनुवाद व्हायला हवा.’’
पॉप्युलर मध्ये असे काही सुरू असेल तर संपादक अस्मिता मोहिते याच काही सांगू शकतील असे म्हणत भटकळ यांनी आणखी एक वाट करून दिली. अस्मिता म्हणाल्या, ‘‘काही वर्षांपुर्वीच शहा व आणखी एकदोघांनी ‘लमाण’ चा अनुवाद आहे का अशी विचारणा केली होती. त्यावेळी नाही असे सांगतानाच अनुवाद व्हायला हवा असे ठरवले होते. काहीजणांना त्याबाबत विचारणाही केली, मात्र पुढे प्रतिसाद मिळाला नाही.’’
----------------------