"नानासाहेबांचे विचार आचरणात आणा"
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2019 01:18 AM2019-03-06T01:18:17+5:302019-03-06T01:18:27+5:30
‘नानासाहेब धर्माधिकारी हे कर्तृत्ववान व दूरदृष्टी असलेले व्यक्तिमत्त्व होते. समाजमनाच्या विचाराबरोबर परिसर स्वच्छता हादेखील त्याचा ध्यास होता.
वारजे : ‘नानासाहेब धर्माधिकारी हे कर्तृत्ववान व दूरदृष्टी असलेले व्यक्तिमत्त्व होते. समाजमनाच्या विचाराबरोबर परिसर स्वच्छता हादेखील त्याचा ध्यास होता. त्यामुळे त्यांनी दिलेले विचार व संस्कार वैयक्तिक जीवन जगताना आचरणात आणले पाहिजेत. यातून आपण त्यांचे स्मरण सर्वांनी जपले पाहिजे,’ असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले.
वनदेवी मंदिर कर्वेनगर ते शिंदेपूल शिवणे या मुख्य एनडीए रस्त्याला महाराष्ट्र भूषण तीर्थरूप डॉ. नानासाहेब तथा नारायण विष्णू धर्माधिकारी पथ असे नामकरण करण्यात आले. या नामकरण फलकाचे उद््घाटन शरद पवार यांच्या हस्ते मंगळवारी झाले.
या वेळी शरद पवार यांना पद्मविभूषण व तीर्थरूप डॉ. अप्पासाहेब तथा दत्तात्रेय नारायण धर्माधिकारी यांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा छत्रपती शिवाजीमहाराज यांची साडेतीन फुटांची प्रतिमा व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
गणपती माथा येथील एनडीएच्या मैदानात हजारो नागरिकांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री सुनील तटकरे यांच्यासह धर्माधिकारी परिवारातील उमेश, सचिन, राहुल, अर्चना, स्वराली श्रेयस हे आणि शारवीय देशपांडे, सचिन दोडके, कुमार गोसावी, सायली वांजळे, दीपाली धुमाळ, दत्ता धनकवडे, संजय जगताप, सचिन बराटे काका चव्हाण व्यासपीठावर होते. सामान्य माणसांवर योग्य संस्कार, विचार देण्याचे काम व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी नानासाहेबांनी आयुष्यभर कष्ट केले. म्हणून त्यांचे नाव या रस्त्याला दिले आहे. बैठकीतील लोकांनी परिसर स्वच्छतेकडे अधिक लक्ष देण्याची गरज त्यांनी व्यक्त केले.
>तुमच्याकडून शिस्त शिकण्याची गरज
२० ते २५ हजारांचा जनसमुदाय असूनही कार्यक्रमात कुठेही रेटारेटी, गोंधळ झाला नाही. सर्व नागरिक भरउन्हात दुपारी दीडपर्यंत शांत बसले होते. याचे कौतुक करताना खासदार सुळे म्हणाल्या, की सदस्यांच्या शिस्तीची दाद देते. माझ्याकडे तुमच्यासारखी शिस्त नाही. निवडणुकीनंतर आठवडाभर रेवदंडा येथे राहून शिस्त शिकणार. समाजाला अध्यात्मची गरज आहे. धर्माधिकारी परिवार गेली अनेक वर्षे समाजकार्य करीत आहे. एवढा मोठ्या संख्येने जनसमुदाय आल्यानतर सकाळी काही काळ येथील रस्ते व चौकात कोंडी होत होती. काही सदस्य तर सकाळी सात वाजताच मैदानात येऊन बसले होते. कार्यक्रमानंतरही स्वयंसेवकांनी केलेल्या योग्य नियोजनानंतर फारशी गडबड न होता नागरिक आपापल्या घरी परतले.
>‘‘अशा बैठकांमुळे माणसा-माणसांमध्ये बंधुत्व, प्रेम वाढत आहे. माणसाच्या या शक्तीचा उपयोग समाजातील अन्य घटकांच्या उभारणीसाठी केला जावा. सामूहिक शक्तीच्या माध्यमातून देश बलशाली व बलदंड करण्याची गरज आहे. ही गरज नानासाहेब धर्माधिकारी यांनी मांडली. तो वारसा अप्पासाहेब व सचिन धर्माधिकारी जपत आहेत, असे पवार म्हणाले.
अप्पा धर्माधिकारी म्हणाले, ‘‘चांगल्या विचारांची आज गरज आहे. मन स्वच्छ असले तरच सर्व स्वच्छ दिसेल. सध्या अनेक जण चंगळवादाकडे वळत आहे. त्यांच्यापर्यंत संतसाहित्याच्या माध्यमातून मानवता धर्माची शिकवण ही पोहोचविली पाहिजे. संशयामुळे माणूस भरकटतो. सध्या बहुतेक ठिकाणी होत असलेल्या समर्थ बैठकीमुळे हे प्रमाण कमी झाले आहे.