लोहगाव विमानतळ प्रवासीसेवेत तिसरे, ५० लाख ते दीड कोटी प्रवासीसंख्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 03:47 AM2018-03-08T03:47:22+5:302018-03-08T03:47:22+5:30
लोहगाव विमानतळाने वार्षिक ५० लाख ते दीड कोटी प्रवासी संख्या असणाºया विमानतळांच्या यादीत तिसरे स्थान पटकाविले आहे. ‘जागतिक दर्जाची सेवा’ या निकषावर एअरपोर्ट कौन्सिल इंटरनॅशनलने ही निवड केली आहे.
पुणे - लोहगाव विमानतळाने वार्षिक ५० लाख ते दीड कोटी प्रवासी संख्या असणाºया विमानतळांच्या यादीत तिसरे स्थान पटकाविले आहे. ‘जागतिक दर्जाची सेवा’ या निकषावर एअरपोर्ट कौन्सिल इंटरनॅशनलने ही निवड केली आहे.
प्रवाशांच्या पसंतीनुसार संबंधित विमानतळाचा सेवा दर्जा ठरविला जातो. या वर्षी पुणे विमानतळातून ८० लाख प्रवासी उड्डाण करतील. इतक्या मोठ्या प्रमाणावरील प्रवाशांना चांगली सेवा देण्यासाठी विमानतळ-अधिकारी आणि कर्मचाºयांबरोबरच भारतीय वायुदल, कस्टम, इमिग्रेशन, टॅक्सी सेवा देणारे, पीएमपी बससेवा यांचादेखील तितकाच सहभाग असल्याचे विमानतळ प्रशासनाकडून सांगण्यात आले.
हैदराबाद विमानतळाने या प्रकारात सलग चौथ्यांदा पहिला क्रमांक पटकाविण्याची कामगिरी केली आहे. इंडोनेशियाचा बालिकपापन आणि मंगोलियाच्या होहॉट बैता इंटरनॅशनल एअरपोर्टने संयुक्त दुसरे स्थान मिळविले आहे. तर, पुण्याने कोचीन आणि कोलकता एअरपोर्टसह संयुक्त तिसरे स्थान मिळविले आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून प्रवाशांची वाढती संख्या, गरज आणि मागणी लक्षात घेऊन सातत्याने पुणे विमानतळाच्या सेवेत सुधारणा करण्यात येत आहेत. त्यामुळे विमानतळाच्या गुणांकनामध्ये सातत्याने सुधारणा होत आहे. पुणे विमानतळाला २०१६मध्ये ४.७८ गुणांकन होते. त्यात डिसेंबर २०१७ मध्ये ४.८० पर्यंत वाढ झाली. या पुढील उच्च श्रेणी ही ४.८५ असून, त्या पुढील श्रेणी ५ गुणांकाची असते.
विमानतळ सेवा दर्जा (एअरपोर्ट सर्व्हिस क्वॉलिटी) हे जगभरात राबविले जाणारे अभियान आहे. हा दर्जा ठरविताना विविध प्रकारच्या ३४ बाबी ध्यानात घेतल्या जातात. विमानतळाला पोहोचण्याच्या सोयी-सुविधा, सुरक्षा योजना, शयनगृह, रेस्टॉरंट आणि इतर सोयीसुविधांचा विचार या वेळी केला जातो.