कोरोना लसीचा तिसरा डोसही घ्यायला हवा; मी स्वत: घेतला, सायरस पूनावाला यांचं मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2021 08:15 PM2021-08-13T20:15:23+5:302021-08-13T20:20:20+5:30
कोरोना लसीचा तिसरा बुस्टर डोस घ्यायला हवा, असं सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अध्यक्ष सायरस पूनावाला यांनी सांगितलं
पुणे: दर महिन्याला दहा किंवा अकरा कोटी लसीचे डोस देणे अवघड आहे. जगात कोणतीही कंपनी एवढ्या मोठ्या प्रमाणात लसीचे उत्पादन करू शकत नाही. भारत सरकार वर्षअखेरीस लसीकरण पूर्ण होण्याचे आश्वासन देत आहे. त्यांनी अशा थापा मारणे बंद करावे, असा निशाणा सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अध्यक्ष सायरस पूनावाला यांनी सरकारला लगावला. सायरस पूनावाला यांना आज लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
कोरोनाचा सर्वाधिक फटका राज्यातील मुंबई आणि पुणे या दोन मुख्य शहरांना बसला. पुण्यातील रुग्णसंख्या ही मधल्याकाळात मुंबईपेक्षा जास्त होती. त्यामुळे पुण्यात असणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूटमध्ये तयार होणाऱ्या कोव्हिशिल्ड लसी आधी पुण्यात द्याव्यात अशी मागणी केली होती. मात्र त्यावर काही ठोस निर्णय झाला नाही. मोदी सरकारने या बद्दल काहीच उत्तर दिले नसल्याचा खुलासा देखील सायरस पूनावाला यांनी यावेळी केला आहे.
लसीच्या किमतीत बदल झाल्याने सीरमचा नफा मोठ्या प्रमाणात बुडाला, पण भारतातील लोकांना लस मिळावी यासाठी आम्ही तो सहन केलं. सीरमची लस ही जगातील सर्वांत स्वस्त आहे. कोव्हिशील्ड लस घेतल्यानंतर सहा महिन्यांनी शरीरातील अॅन्टीबॉडीज कमी होतात असा रिपोर्ट लॅन्सेटमध्ये छापून आलाय. ते खरे आहे. त्यामुळेच तिसरा बुस्टर डोस घ्यायला हवा. मी स्वतः तिसरा बुस्टर डोस घेतलाय, असे देखील पूनावाला यांनी यावेळी सांगितलं.
It fills us with great pride to see Dr. Cyrus S. Poonawalla has been conferred the Lokmanya Tilak National Award 2021 for his exceptional contribution with the vaccines produced in India. Congratulations! pic.twitter.com/bSJJrZCKY0
— SerumInstituteIndia (@SerumInstIndia) August 13, 2021
मोदी सरकारने लस परदेशात पाठवायला बंदी घालून अतिशय वाईट गोष्ट केलीय. माझा मुलगा मला म्हणाला की यावर बोलू नको, पण मी बोलणार आहे. कारण सिरम इन्स्टिट्यूट अनेक वर्षांपासून जगातील १७० देशांना लस पुरवते. पण आता त्यांना गरज असताना त्यांना लस देता येत नाही. या देशांनी लसीसाठी आधीच पैसै दिलेत. बील गेट्स फाउंडेशनने पाच हजार कोटी रुपये दिलेत. लसींची निर्यात सुरू केली पाहिजे. अनेक देशांनी आगाऊ पैसे दिले आहेत. त्यांना लसी पाठवायच्या आहेत.
दरम्यान, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाउन हा प्रभावी उपाय असल्याचं सरकारकडून सांगितलं जात आहे. तसे निर्णयही घेतले जात आहेत. मात्र, लॉकडाउन लावणे योग्य नाही. सरकारने लॉकडाऊन लावू नये,' असं पूनावाला यांनी म्हटलं आहे. 'कोरोना मृत्युदर खूपच कमी आहे. मृत्यू वाढत असतील, तरच लॉकडाऊनचा पर्याय स्वीकारावा,' असा सल्ला देखील सायरस पूनावाला यांनी सरकारला दिला.
कोविशिल्ड लहान मुलांना देणं धोकादायक-
कोविशिल्ड लहान मुलांना देणं धोकादायक ठरू शकतं, त्यामुळे १८ वर्षांखालील मुलांना कोविशिल्ड देणार नाही, असं पुनावाला यांनी म्हटलं आहे. तसंच कोरोनाची तिसरी लाट इतकी गंभीर नसेल असं मतही सायरस पुनावाला यांनी व्यक्त केलं आहे.