पुणे विमानतळावर सामानाची तपासणी करणार ‘तिसरा डोळा’
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2020 10:08 PM2020-01-10T22:08:42+5:302020-01-10T22:09:08+5:30
नवीन सॉफ्टवेअर, सुक्ष्म गोष्टींही दिसणार
पुणे : विमानतळावर कोणतीही आक्षेपार्ह वस्तू घेऊन जाणे आता सुरक्षा रक्षकांच्या नजरेतून सुटणार नाही. प्रवाशांच्या सामानाची तपासणी करण्यासाठी कृत्रिम बुध्दिमत्तेचा (आर्टिफिशिल इंटिलिजन्स) आधार घेत नवीन सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले असून त्याद्वारे अत्यंत सुक्ष्म वस्तुही सहजरीत्या दिसणार आहे. त्यामुळे पुणेविमानतळाच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा ‘तिसरा डोळा’ महत्वाचा ठरणार आहे. त्याची नुकतीच चाचणी सुरू करण्यात आली आहे.
पुणे विमानतळ हे हवाई दलाचे असल्याने अत्यंत संवेदनशील आहे. त्यामुळे या विमानतळाच्या सुरक्षेच्यादृष्टीने सातत्याने विविध पावले उचलली जातात. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडून विमानतळाच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळली जाते. काही महिन्यांपुर्वीच विमानतळावर अत्याधुनिक बॉडी स्कॅनर बसविण्यात आला आहे. या माध्यमातून प्रवाशांची वेगाने तपासणी करणे शक्य होत आहे. देशातील काही मोजक्याच विमानतळांवर असा स्कॅनर बसविण्यात आला आहे. आता विमानतळ प्रशासनाने प्रवाशांकडील सामानाची तपासणी करण्यासाठी कृत्रिम बुध्दिमत्तेचा आधार घेत नवीन सॉफ्टवेअर विकसित केले आहे. यापुर्वी सामानाची तपासणी करण्यात काही अडचणी येत होत्या. एखाद्या प्रवाशाच्या सामानाची केवळ वरची तपासणी होत होती. सामानामध्ये काही आक्षेपार्ह वस्तु लपविली असल्यास सुरक्षा रक्षकांनी प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतरच ती निदर्शनास येत होती.
यापार्श्वभुमीवर विमानतळ प्रशासनाने सामानाची तपासणी अधिक काटेकोरपणे करण्यासाठी या यंत्रणेमध्ये नवीन सॉफ्टवेअर बसविले आहे. याद्वारे सामानातील सुक्ष्म वस्तुही लगेच निदर्शनास पडणार आहे. एखादी पाण्याची बाटली असल्यास त्यामध्ये किती पाणी आहे, जेवणाच्या डब्यामध्ये खाद्यपदार्थांव्यतिरिक्त अन्य काही आहे किंवा नाही, बॅगेतील कपड्यांमध्ये काही लपविले आहे किंवा नाही अशा सर्व बारीक गोष्टी लक्षात येणार आहेत. त्यामुळे कोणतीही वस्तु लपुन राहणार नाही. या यंत्रणेमध्ये कोणतीही आक्षेपार्ह गोष्ट आढळून आल्यास लगेचच सुरक्षायंत्रणेला अलर्ट जाईल. ‘आयआयटी’ संस्थेतील माजी विद्यार्थ्यांच्या स्टार्ट अप कंपनीने हे सॉप्टवेअर विकसित केले असून पहिल्यांदाच पुणे विमानतळावर त्याची चाचणी घेतली जात आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर इतर विमानतळांवरही त्याचा वापर होऊ शकतो. विमानतळ प्राधिकरणाच्या ‘इनोव्हेट फॉर एअरपोर्टस’ या उपक्रमांतर्गत स्टार्ट अप कंपन्यांकडून नावीण्युपुर्ण संकल्पना मागविण्यात आल्या होत्या. सुमारे ३५० स्टॉर्ट अपपैकी केवळ ८ ची निवड करून त्यांच्या संकल्पनांची चाचणी विविध विमानतळांवर सुरू करण्यात आली आहे.
------------
प्रवाशांच्या सामानाची तपासणी करण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणेची चाचणी घेतली जात आहे. या माध्यमातून सामानाची अत्यंत बारकाईने तपासणी होईल. त्यातून कोणतीही आक्षेपार्ह वस्तु सुटू शकणार नाही.
- अजय कुमार, संचालक पुणे विमानतळ
---------