भीमाशंकर मंदिरात तिसऱ्या श्रावणी सोमवारीही शुकशुकटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:14 AM2021-08-24T04:14:27+5:302021-08-24T04:14:27+5:30
तळेघर : जंगलवस्ती भीमाशंकर महाराज की जयघोष करत ब्रह्मवृंद व पुजारी बांधवांनीच श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे तिसऱ्या श्रावणी सोमवारीही पवित्र ...
तळेघर : जंगलवस्ती भीमाशंकर महाराज की जयघोष करत ब्रह्मवृंद व पुजारी बांधवांनीच श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे तिसऱ्या श्रावणी सोमवारीही पवित्र शिवलिंगावर जलाभिषेक करत महापूजा करून आरती केली.
तळेघर : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या पुणे जिल्ह्यातील श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे दर वर्षी तिसऱ्या श्रावणी सोमवारी विशेष गर्दी असते. मात्र, कोरोनाच्या सावटामुळे गेल्यावर्षीपासून ही गर्दी दिसलीच नाही. त्यामुळे तिसरा श्रावणी सोमवार असूनही भीमाशंकर मंदिर परिसरात शुकशुकाट पाहायला मिळाला.
पर्यटक आणि भाविक नसले, तरी मंदिरातील श्रावण सोमवारचे विशेष पूजा-विधी तितक्याच उत्साहाने आणि भक्तिपूर्ण वातावरणात पार पडले. नियमानुसार पहाटे साडेचार ते पाच या वेळामध्ये श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिरातील महापूजा व आरती विश्वस्त पुजारी यांच्या हस्ते झाली. या वेळी अनिल लबडे मित्र परिवार, मंचर ग्रुप यांच्या वतीने तीनशे किलो विविध रंगांच्या फुलांचा वापर करून शिवलिंग व मंदिर गाभारा सजविण्यात आला. यामध्ये झेंडू, अस्टर, चमेली, शेवंती, डिजी, गुलछडी, अशा रंगीबेरंगी फुलांचा वापर करून मंदिर, गाभारा सजविले होते.
यानंतर मंदिर बंद करण्यात आले. दुपारी पावनेतीन ते सव्वातीन या दरम्यान दुपारची आरती करण्यात आली. पुन्हा मंदिर बंद करून सायंकाळी साडेसात ते आठ वाजता आरती घेण्यात आली. या वेळी देवस्थानचे ज्येष्ठ विश्वस्त मधुकरशास्त्री गवांदे, दत्तात्रय कौदरे, व्यवस्थापक चंद्रकांत कौदरे, गौरक्ष कौदरे उपस्थित होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने भीमाशंकर मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे श्रावणात होणारी भाविकांची गर्दी बंद झाली आणि त्याचा थेट परिणम येथील व्यावसायिकांवर झाला आहे. येथील दुकाने, हाॅटेल यांचा व्यवसाय येथे येणाऱ्या भाविक आणि पर्यटकांवर अवलंबून आहे. मात्र पर्यटकांचा मुख्य स्रोतच कमी झाल्यामुळे येथील व्यावसायिकांवर अक्षरश: उपासमारीची वेळ आली आहे. अवघ्या वर्षभराची रोजीरोटी या श्रावण महिन्यामध्ये असते. परंतु संपूर्ण श्रावणी यात्राच बंद असल्यामुळे ग्रामस्थ हिरमुसले आहेत.
प्रत्येक वर्षी श्रावण महिन्यामध्ये कोकणातून पायी येणारे कोकणी बांधव हे याही वर्षी येताना दिसत आहेत. परंतु, पोलीस प्रशासन व स्थानिक ग्रामस्थांकडून सूचना मिळताच पुन्हा घाटावरूनच माघारी फिरत आहेत. पोलीस अधीक्षक डाॅ. अभिनव देशमुख व उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल लंभाते यांच्या आदेशान्वये व घोडेगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली डिंभे, पालखेवाडी व श्री भीमाशंकर येथे नाकाबंदी करण्यात आली असून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
--
कोट
कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम कायद्यानुसार मंदिर व मंदिर परिसरामध्ये संचार बंदी सुरू आहे. त्यामुळे नियमभंग केल्यास त्यावर कडक कारवाई करण्यात येईल, त्यामुळे पर्यटक व भाविकांनी या त्यांच्या श्रध्देला बांध घालून यंदा घरूनच देवाला नमस्कार करावा व येथे प्रत्यक्षात येणे टाळावे.
- जीवन माने, सहायक पोलीस निरीक्षक
---फोटो क्रमांक : २३ तळेघर भीमाशंकर मंदिर फोटो ओळी : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही भाविकांसाठी बंद असल्याने तिसऱ्या श्रावणी सोमवारी मंदिर परिसरात असलेला शुकशुकाट.