तृतीयपंथी देखील होणार न्यायदानात सहभागी ;लोक अदालतीत १३ पॅनेलमध्ये करण्यात आली नियुक्ती
By नम्रता फडणीस | Published: February 27, 2024 07:00 PM2024-02-27T19:00:02+5:302024-02-27T19:02:42+5:30
विशेष म्हणजे हे सर्व तृतीयपंथी उच्चशिक्षित असून, त्यांच्या वर्गासाठी सामाजिक कार्यात कार्यरत आहेत
पुणे : आज तृतीयपंथी विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत. आता न्यायालयातील प्रक्रियेतही त्यांना सहभागी करुन घेण्यात आले असून, ते देखील लोक अदालतीत न्यायदानाचे काम करणार आहेत. यासाठी आगामी लोक अदालतीतील १३ पॅनेलमध्ये तृतीयपंथीयांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनाही पक्षकारांमधील वाद तडजोडीतून मिटवता येणार आहेत.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून त्यांची नुकतीच पॅनेल सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हे सर्व उच्चशिक्षित असून, त्यांच्या वर्गासाठी सामाजिक कार्यात कार्यरत आहेत. त्यांचे शिक्षण आणि ते करीत असलेले काम या निकषांवर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव सोनल पाटील यांनी दिली.
जिल्ह्यात पहिल्यांदाच १३ तृतीयपंथीयांना लोक अदालतीत पॅनेल सदस्य म्हणून सहभागी करून घेण्यात येत आहे. तृतीयपंथीयांना आज समाजात सर्वच स्तरांत मानाचे स्थान आहे. त्यामुळे त्यांचा न्यायालयीन प्रक्रियेत सहभाग वाढावा म्हणून आम्ही ही निवड करीत आहोत. निवडीची प्रक्रीया तंतोतंत पाळत त्यांना ही संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यांच्याकडे मोटार वाहन कायद्याच्या संदर्भात असलेली प्रकरणे निकालासाठी दिली जाणार आहेत. त्यामुळे त्यांना देखील न्यायदान करणे काहीसे सोपे होणार आहे. त्यांच्याबरोबर काही महाविद्यालयातील विधीचे विद्यालयांचे विद्यार्थी देखील लोक अदालतमध्ये सहभागी होणार आहेत.
प्रमुख जिल्हा न्यायाधीश व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष महेंद्र महाजन यांच्या मार्गदर्शनानुसार राज्यात पहिल्यांदाच अशा प्रकारच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. तृतीयपंथींना समाजाच्या प्रवाहामध्ये समावून घेणे. त्यांना रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात. तसेच सर्वांना समान हक्क मिळण्याचे संविधानाचे उद्दिष्ट साध्य व्हावे, यासाठी तृतीयपंथीयांना ही संधी उपलब्ध करून दिली आहे- सोनल पाटील, सचिव, विधी सेवा प्राधिकरण