तृतीयपंथीयांना मिळणार प्रमाणपत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 03:17 AM2019-01-31T03:17:44+5:302019-01-31T03:17:58+5:30
गैरप्रकार रोखण्यासाठी विधी सेवा प्राधिकरणाचा उपक्रम; खरे-खोटे तृतीयपंथीय ओळखणे होणार सोपे
पुणे : तृतीयपंथी असल्याचे भासवत गैरप्रकार करणाऱ्यांना लगाम लावण्यासाठी बुधवार पेठमध्ये वास्तव्यास असलेल्या तृतीयपंथीयांना ते तृतीयपंथीय असल्याचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने हा उपक्रम हाती घेतला असून पुढील महिन्यांपासून त्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.
शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या बुधवार पेठमध्ये मोठ्या प्रमाणात तृतीयपंथीय राहत आहेत. त्याठिकाणी राहणाºया काही व्यक्ती या मुद्दाम आपण तृतीयपंथी असल्याचे भासवून नागरिकांना लुटत आहेत. रात्रीच्या वेळी असे प्रकार सर्रास सुरू असतात. त्यामुळे या प्रकारांना लगाम लागावा आणि खरे तृतीयपंथीय ओळखता यावे, यासाठी त्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत, अशी माहिती प्राधिकरणाचे सचिव चेतन भागवत यांनी गुरुवारी दिली. याबाबत ससून रुग्णालय प्रशासनाशी पत्रव्यवहार करण्यात येणार आहे. प्रमाणपत्राची प्रक्रिया काय असेल, हे निश्चित झाल्यानंतर आशीर्वाद संस्थेच्या माध्यमातून टप्प्याटप्याने तृतीयपंथीयांना तपासणीसाठी ससूनला पाठविण्यात येईल. त्यानंतर त्यांना प्रमाणपत्र देण्यास सुरुवात होईल, असे भागवत यांनी सांगितले.
गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही नागरिकांना आशीर्वाद देवून पोट भरत आहोत. आम्ही ती परंपरा तर बंद करू शकत नाही. प्रमापपत्र देण्याची योजना काय आहे, याची पूर्ण माहिती अद्याप आम्हाला देण्यात आलेली नाही. आतापर्यंत आम्हाला सरकारने काहीच मदत केली नाही, याची खंत आहे, असे आशीर्वाद संस्थेच्या प्रमुख पन्ना बारगेल यांनी सांगितले.
शिबिरात वैद्यकीय तपासणी
बुधवार पेठेत राहत असलेल्या तृतीयपंथीयांसाठी विधा सेवा प्राधिकरण आणि फरासखाना पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने वैद्यकीय तपासणी व कायदेशीर बाबींचे मार्गदर्शन शिबिर आयोजित केले होते.
ससूनमधील डॉ. नितीन पनाड, डॉ. आनंद कपाडिया, डॉ. रिचा शर्मा, डॉ. हृषीकेश नाईक, डॉ. सतीश पोरे, डॉ. समीर तिरथाडे यांनी सुमारे ७० तृतीयपंथीयांची वैद्यकीयंं तपासणी केली. तर भागवत यांनी तृतीयपंथीयांबाबत प्रचलित कायदे आणि त्यांचे अधिकार याबाबत मार्गदर्शन केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नावंदे, सहायक पोलीस निरीक्षक आरती खेतमाळीस, पोलीस नाईक सचिन कुटे आदी यावेळी उपस्थित होते.
अनेक तृतीयपंथीयांना नोकरी करण्याची इच्छा आहे. प्रमाणपत्रामुळे त्यांना नोकरी मिळणे सोपे होईल. सुरुवातीला केवळ बुधवार पेठेमधील तृतीयपंथीयांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. पुढील काळात त्याची व्याप्ती वाढविण्यात येईल.
- चेतन भागवत, सचिव, पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण