अकरावी प्रवेशाच्या तिस-या फेरीला सुरूवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:28 AM2020-12-11T04:28:21+5:302020-12-11T04:28:21+5:30
पुणे: पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता अकरावी प्रवेशाच्या तिस-या फेरीचे वेळापत्रक जाहीर झाले असून, विद्यार्थ्यांना ...
पुणे: पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता अकरावी प्रवेशाच्या तिस-या फेरीचे वेळापत्रक जाहीर झाले असून, विद्यार्थ्यांना येत्या १२ डिसेंबरपर्यंत तिस-या फेरीतील प्रवेशासाठी ऑनलाइन अर्जाचा पहिला व दुसरा भाग भरता येणार आहे. केंद्रीय प्रवेश समितीतर्फे तिस-या फेरीच्या रिक्त जागांची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.
अकरावी प्रवेशाच्या दोन फे-यांनंतर ४१ हजार विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेश प्रकियेतून प्रवेश मिळाला असून ६६ हजारापेक्षा अधिक जागा रिक्त आहेत. प्रवेश समितीने तिस-या प्रवेश फेरीचे वेळापत्रक प्रसिध्द करून विद्यार्थ्यांना ऑनलाइन पध्दतीने अर्ज भरण्याचे आवाहन केले आहे. नियोजित कालावधीत अर्ज करणा-या विद्यार्थ्यांची प्रवेश यादी येत्या १५ डिसेंबर रोजी प्रसिध्द केली जाणार आहे.तर प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना १५ ते १८ डिसेंबर या कालावधीत संबंधित महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यावा लागणार आहे.
तिस-या फेरीनंतर रिक्त राहिलेल्या जागांसाठी विशेष फेरी घेतली जाणार आहे. त्यात इनहाऊस कोटा, व्यवस्थापन कोटा, अल्पसंख्यांक कोट्यातील जागांचा समावेश केला जाणार आहे,असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.