भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची..! संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील तिसरा रिंगण सोहळा देहूत साजरा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2021 04:06 PM2021-07-15T16:06:34+5:302021-07-15T16:19:29+5:30
परंपरेनुसार सराटी येथील मुक्कामावरून संत तुकाराम महाराजांचा पायीवारी सोहळ्यातील तिसरे रिंगण अकलुजजवळ झाले असते.
देहूगाव : जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या ३३६ व्या पायीवारी पालखी सोहळ्यातील वाटचालीतील अश्वासह तिसरे गोल रिंगण सोहळा मुख्य मंदिराच्या आवारात पार पडले. गुरुवारी(दि. १५) पालखी सराटी येथील मुक्कामावरून पुढे पहाटे सहाच्या सुमारास अकलुजकडे रवाना झाली असती. सकाळची न्याहरी झाल्यानंतर पालखी अकलुजजवळ गोल रिंगण झाले असते. याच सोहळ्याचे प्रतिकात्मक रिंगण सोहळा मंदिराच्या आवारात पार पडला. हे रिँगण देखिल अश्वासह वारीतील विणेकरी, पताका, तुळस, टाळ व मृदंग वादकांसह पार पडले. सध्या कोरोनाचा प्रादुर्भावामुळे शासनाने घालुन दिलेल्या निर्बंधांमुळे पायीवारी न होता प्रतिकात्मक वारी होत आहे.
१ जुलैच्या पालखी प्रस्थानानंतर श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुका येथील भजनी मंडपात ठेवून नित्योपक्रम सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणजे वारीच्या वाटचालीतील प्रतिकात्मक अश्वासह पहिले गोल रिंगण पार पडले. विठ्ठल रुख्मिणी मंदिरात पहाटे चार वाजता काकड आरती झाली. त्यानंतर श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिर, नारायण महाराज समाधी मंदिर व वैंकुठगमन मंदिरात नित्यनियमाप्रमाणे महापूजा संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे व पालखी सोहळा प्रमुख अजित महाराज मोरे, संजय महाराज मोरे, विश्वस्त संतोष महाराज मोरे आदीच्या उपस्थितीत संपन्न झाली.
श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना सकाळी ८ वाजता निरा नदीच्या पाण्याने इंद्रायणी नदी पाञात स्नान घातले. सकाळी अकरा वाजता मंदिरातील भजनी मंडळात भजनाला सुरूवात झाली. त्यानंतर सव्वा अकराच्या सुमारास पालखी मंदिराच्या आवारात प्रदक्षिणेसाठी बाहेर घेण्यात आली.यावेळी शिंगाडेवाले पोपट तांबे यांनी तुतारी वाजविताच उपस्थित सेवेकऱ्यांनी गरुड टक्के, अब्दागिरी, पताका व जरी पटका घेत आप आपल्या सेवेला सुरवात केली. त्यानंतर पालखीचे भोई यांनी पालखी खांद्यावर घेत मंदिराच्या आवारात आणली.
दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पावले खेळ झाल्यानंतर वारीतील वाटचालीप्रमाणे उपस्थित वारकऱ्यांनी गोल रिंगण केले. तेथे काही काळ भजन करीत पावले फुगड्यांचाही डाव रंगला व गोल रिंगणाला सुरवात झाली. सर्व उपस्थित विणेकरी, पखवाज वादक, वारकरी संप्रदायाची भगवी पताका खांद्यावर घेऊन वारकरी, डोक्यावर तुळस घेऊन वारकरी भगिनी मंदिराच्या आवारात रिंगणात धाव घेतली. हे दृश्य अत्यंत विलोभनीय दिसत होते. याचवेळी रिंगणात सेवेकऱ्यांनी अश्व आणला. घोडेस्वाराच्या खांद्यावर भगवी पताका घेऊन अश्व रिंगणात सोडण्यात आला. यावेळी वारकऱ्यांनी ज्ञानोबा तुकाराम नामाचा गजर करीत आनंद व्यक्त केला व अकलुजचे व वारीतील तिसरे गोल रिंगण सोहळा पार पडला व पालखी दुपारच्या विश्रांतीसाठी मंदिराच्या भजनी मंडपात विसावली.