महामेट्रोच्या भुयारी मार्गाचे तिसरे टीबीएम लवकरच पुण्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2020 07:40 PM2020-02-12T19:40:30+5:302020-02-12T19:42:25+5:30
या जागेत चार बोगद्यांचे जाणाऱ्या व येणाऱ्या अशा दोन मेट्रोंसाठी सलग असे दोन बोगदे
पुणे: महामेट्रोच्या शिवाजीनगर ते स्वारगेट या भुयारी मार्गाच्या खोदाईसाठीचे तिसरे टनेल बोअरिंग मशिन(टीबीएम) लवकरच पुण्यात येत आहे. हॉँगकॉँगहून ते बोटीने मुंबईत व तिथून मालमोटारीने लवकरच पुण्यात येईल. स्वारगेटपासून पुढे मंडईकडे या टीबीएमने बोगद्याची खोदाई सुरू होईल.
एकूण ४ टीबीएम वापरून हे दोन बोगदे तयार करण्यात येत आहेत. कृषी महाविद्यालयाकडून दोन बोगद्याची खोदाई सुरू झाली आहे. त्यातील एक बोगदा ३०० मीटरपेक्षा पुढे गेला आहे. दुसरा बोगदाही १५० मीटर खोदून झाला आहे. १०० फूट लांबीच्या दोन टीबीएमने हे काम होत आहे. प्रत्येक बोगदा साडेसहा मिटर व्यासाचा आहे. खोदाई होत असतानाच त्याला या यंत्राच्या साह्याने आतील बाजूने सिमेंटचे अस्तरही लावले जात आहे.
आता स्वारगेटजवळून दुसऱ्या दोन बोगद्यांची खोदाई सुरू होईल. स्वारगेट जवळच्या पीसीएमटी स्थानकासमोर असलेल्या जुन्या स्वारगेट तलावाच्या जागेतून ही खोदाई सुरू होणार आहे. टीबीएन आत उतरवण्यासाठी या ठिकाणी दोन मोठे शाफ्ट (स्लोब-ऊतार) करण्यात आले आहेत. या बाजूने दोन व कृषी महाविद्यालयाकडून येणारे दोन बोगदे मंडईतील जुन्या झुणका भाकर केंद्राच्या जागेत एकत्र येतील. ही चारही टीबीएम याच जागेतून खालील बाजूसच सुटी करून वर घेतली जाणार आहेत.
या जागेत चार बोगद्यांचे जाणाऱ्या व येणाऱ्या अशा दोन मेट्रोंसाठी सलग असे दोन बोगदे होतील. या भूयारी मार्गाचे एकूण अंतर ५ किलोमीटर आहे. शिवाजीनगर, सिव्हिल कोर्ट, कसबा पेठ, मंडई व स्वारगेट अशी एकूण ५ भूयारी स्थानके या मार्गात आहेत. स्थानकाच्या जागेत हे बोगदे एकत्र होतील व स्थानकातूनच प्रवाशांना जमीनीवर येण्यासाठीची व्यवस्था असेल. साधा जिना, सरकता जिना व लिफ्ट अशा तीनही सुविधा याठिकाणी असणार आहेत. जमीनीखाली २२ ते २८ फूट अंतरावर ही स्थानके असणार आहेत.
महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित म्हणाले, फक्त खोदाईतच आधुनिक यंत्र वापरली जात नाहीत तर पुणे मेट्रोच्या मेट्रोसहितच्या स्थानक व प्रत्येकच कामातच गुणवत्ता व दर्जाविषयी जागरूकता ठेवली जात आहे. भूयारी मार्गाच्या कामाबरोबरच उन्नत मार्गाचेही काम सुरू आहे. वनाज ते गरवारे महाविद्यालय व पिंपरी-चिंचवड ते दापोडी हे दोन व प्राधान्य मार्ग म्हणून निश्चित करण्यात आले आहेत. ते लवकर सुरू व्हावेत यासाठी त्यावर गतीने काम होत आहे.