तिसरी लाट मुलांसाठी ठरणार घातक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:12 AM2021-05-18T04:12:00+5:302021-05-18T04:12:00+5:30
पालकांनी घ्यावी काळजी : कोविडयोग्य वर्तणुकीची सवय लावा पुणे : कोविड संसर्गाच्या घटनांची शहरी भागात मोठ्या प्रमाणात वाढ झाली ...
पालकांनी घ्यावी काळजी : कोविडयोग्य वर्तणुकीची सवय लावा
पुणे : कोविड संसर्गाच्या घटनांची शहरी भागात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तिसरी लाटदेखील लहान मुलांसाठी अधिक धोकादायक ठरणार असल्याची प्रतिक्रिया बालरोगतज्ज्ञांनी दिली आहे. विषाणूचे म्युटेशन आणि वेगवान संसर्ग यामुळे तिसऱ्या लाटेत पालकांना मुलांबाबत अधिक सतर्क राहावे लागणार आहे. मुलांवर कोरोनाचे उपचार करण्याची वेळ येण्यापेक्षा प्रतिबंधात्मक उपायांवर भर देण्याचे आवाहन केले जात आहे. शून्य ते १० वर्षे वयोगटांत गेल्या एप्रिलपासून या वर्षीच्या एप्रिल महिन्यापर्यंत पुण्यात २० हजार १६५ मुलांना कोरोनाची लागण झाली आहे.
सॅनिटायझर्सचा वापर, खोकताना किंवा शिंकताना तोंडासमोर रुमाल अथवा टिश्यू पेपर धरावा, समोरच्या व्यक्तीशी बोलताना कमीतकमी ६ फूट अंतर राखावे. विशेषत: आजारी असलेल्यांनी इतर व्यक्तींच्या संपर्कात येणे टाळावे, असे केल्याने मुलांना संसर्ग होण्यापासून रोखता येईल. अस्वच्छ हातांनी आपले डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करू नका, जर आपण वारंवार स्पर्श केला तर विषाणू संसर्गाचा धोका अधिक वाढतो. मुलांना ताप, खोकला तसेच श्वास घेण्यास त्रास होत असेल तर डॉक्टरांशी सल्लामसलत करून त्यातील लक्षणांविषयी माहिती द्या. वेळीच तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या व उपचारास विलंब करू नका, असेही डॉक्टरांचे म्हणणे आहे.
-------
वयोगट मार्च एप्रिल मे
० ते १० २३८२ ६३६० ९०४
११ ते २० ४५२६ ११२७६ १७३३
----------
बाल रुग्णांसाठी प्रशासनाची तयारी
ससून रुग्णालयात लहान मुलांसाठी १०० खाटांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात येत आहे. महापालिकेतर्फे येरवडा येथील राजीव गांधी रुग्णालयात ५० खाटांचे स्वतंत्र रुग्णालय तयार करण्यात येत आहे. याशिवाय, प्रत्येक तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये त्यादृष्टीने तयारी केली जात आहे.
---------
पहिल्या लाटेत लहान मुलांना संसर्गाचे प्रमाण खूप कमी होते आणि ज्यांना कोरोना झाला ती मुले लक्षणेविरहित होती. दुसऱ्या लाटेत मुलांमध्ये ताप, सर्दी, घसा खवखवणे, अंगदुखी, डोकेदुखी या सर्वसामान्य लक्षणांप्रमाणे जुलाब, पोट दुखणे, उलट्या होणे ही लक्षणेही दिसून येत आहेत. लहान मुलांसाठी डिसेंबरपर्यंत तरी लस येण्याची शक्यता नाही. त्यामुळे काळजी हीच सध्याची लस आहे. पालकांनी विनाकारण मुलांना घराबाहेर घेऊन जाऊ नये. हात धुणे, नाकात, तोंडात बोट न घालणे, डोळे न चोळणे, मास्क वापरणे या सवयी लावाव्यात. आहारात हिरव्या पालेभाज्या, फळे, कच्च्या भाज्या यांचे प्रमाण वाढवावे. जंक फूड टाळावे. घरच्या घरी मुलांकडून
व्यायाम, प्राणायाम करून घ्यावे.
- डॉ. संजय मानकर, बालरोगतज्ज्ञ
----
बहुतेक मुलांमध्ये सौम्य तसेच गंभीर स्वरूपाची लक्षणे दिसून आली असून अशा मुलांवर देखील यशस्वीरीत्या उपचार करण्यात आले आहेत. प्रौढांमध्ये लसीकरण झालेले असून लहान मुलांमध्ये लस देण्याबाबत अजूनही संभ्रम आहे. लसीकरणामुळे प्रौढांमध्ये संक्रमणाचे प्रमाण कमी होऊ शकते, तर लहानांमध्ये हे प्रमाण वाढू देखील शकते. ० ते १० वर्षे वयोगटातील मुलांसाठी तिसरी लाट अधिक गंभीर असू शकते. रोग बरा करण्यापेक्षा प्रतिबधांत्मक उपायांचा अवलंब करूने अधिक उत्तम.
- डॉ. तुषार पारेख, बालरोगतज्ज्ञ