सव्वा वर्षात १११ जणांविरुद्ध मोक्का
By admin | Published: April 20, 2016 12:53 AM2016-04-20T00:53:41+5:302016-04-20T00:53:41+5:30
गेल्या सव्वावर्षात पुणे जिल्हा पोलिसांनी पाठविलेल्या सर्वाधिक १३ प्रस्तावांना कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय कुमार वर्मा यांनी मंजुरी दिली
पुणे : गेल्या सव्वावर्षात पुणे जिल्हा पोलिसांनी पाठविलेल्या सर्वाधिक १३ प्रस्तावांना कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय कुमार वर्मा यांनी मंजुरी दिली असून, त्यामधील १११ जणांविरुद्ध मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे़ कोल्हापूर परिक्षेत्रातील पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सांगली आणि सातारा जिल्हा पोलीस अधीक्षकांनी गेल्या वर्षभरात पाठविलेल्या १८ मोक्काच्या प्रस्तावांमधील एकूण १५७ जणांविरुद्ध मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत सशस्त्र दरोडा टाकणाऱ्या मध्य प्रदेशातील झांबुआ टोळीचा सूत्राधार सोबन ऊर्फ गांडो हिमला मछर याच्यासह १४ जणांना पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) अटक केली होती. त्यांच्यावर मोक्कांतर्गत कारवाई व्हावी म्हणून एलसीबीचे वरिष्ठ निरीक्षक राम जाधव यांनी पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव यांच्या मार्फत विशेष पोलीस महानिरीक्षक संजय कुमार वर्मा यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यास मंजुरी मिळाल्यानंतर झांबुआ टोळीविरुद्ध मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली.
सासवड येथील पप्पू उत्तेकर टोळीतील १५, जेजुरी येथील महेश कमलापुरे टोळीतील १२, लोणी काळभोर येथील तुषार हंबीर टोळीतील १२ आणि पौड येथील तुषार गोगावले टोळीतील ६ जणांविरुद्ध देखील मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
कोल्हापूर परिक्षेत्रात १ जानेवारी २०१५ ते ३१ मार्च २०१६ दरम्यान तब्बल १०३ पिस्तुल आणि ३२१ जिवंत काडतुसे जप्त करून १३० हून अधिक जणांना गजाआड केले़
तसेच पुणे ग्रामीण पोलिसांनी लोणावळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक अत्याधुनिक कार्बाइनदेखील जप्त केली आहे.
अवैध धंद्यांवर मोठया प्रमाणात कारवाई करण्यात येत असून चार दिवसांपूर्वी पुणे ग्रामीण पोलिसांच्या एलसीबीने दौंड येथील जुगार अड्डयावर उद्ध्वस्त केला आहे.
१ जानेवारी २०१५ ते ३१ मार्च २०१६ दरम्यान कोल्हापूर परिक्षेत्रातील ५ जिल्हयांमध्ये दरोड्याचे १९१ गुन्हे दाखल असून त्यापैकी तब्बल १७८ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.
दरोड्याचे गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण हे ९३ टक्के
इतके असून त्यामध्ये पुणे ग्रामीण पोलीस अव्वल आहेत. त्यांनी
दाखल असलेल्या गुन्ह्यांपैकी
९५ टक्के गुन्हयांची उकल करून आरोपींना गजाआड केले आहे. (प्रतिनिधी)