सलग तिस-या वर्षी ना थरांचा थरार... ना डिजेचा दणदणाट,
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:13 AM2021-08-26T04:13:40+5:302021-08-26T04:13:40+5:30
माळेगाव : सलग तिस-या वर्षी दहीहंडी उत्सवावरील संकटामुळे गोविंदा मंडळात नाराजी पसरली आहे. लाखो रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. ...
माळेगाव : सलग तिस-या वर्षी दहीहंडी उत्सवावरील संकटामुळे गोविंदा मंडळात नाराजी पसरली आहे. लाखो रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. येत्या ३१ आॅगस्ट रोजी गोपाळकाला अर्थात दहीहंडीचा सण असून श्रावणातील महत्त्वाचा सण आहे. माळेगाव व परिसरात दहीहंडीची १०-१५ गोविंदा मंडळे आहेत. पुणे व पिंपरी चिंचवड येथील नामवंत मंडळाच्या हंडी फोडून लाखोंची बक्षीस मिळवतात.
२०१९ साली कोल्हापूर व सांगली येथील महापूर व २०२०-२१ यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे दहीहंडी उत्सव होणार नाहीत. यामुळे ना थरांचा थरार.. ना डीजेचा दणदणाट, ना सिलेब्रेटींची उपस्थिती यामुळे दहीहंडीचा जल्लोष जाणवणार नाही.
दरम्यान दरवर्षी राजकीय पुढारी, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते आदी मंडळी अनेक मंडळांचे पुरस्कर्ते असतात. मंडळांना टी-शर्ट देणे, प्रवासासाठी वाहन देणे, नाष्टा, जेवण आदींसाठी लाखो रुपये देतात. मात्र, उत्सव रद्द झाल्याने पुरस्कर्त्यांचे पैसे वाचले आहेत. येत्या डिसेंबर व फेब्रुवारी महिन्यात अनेक महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर दहीहंडी उत्सवाच्या माध्यमातून चमकोगिरी करणा-या भावी उमेदवारांची मात्र गोची झाली आहे.
दरवर्षी दहीहंडी उत्सवामधून मिळालेल्या बक्षिसाचा वापर विधायक कायार्साठी खर्च करत होतो. मात्र तीन वर्षांपासून दहीहंडी उत्सव संकटात आहे.
विशाल घोडके- संस्थापक युवाशक्ती दहीहंडी संघ
पुण्यात थरांचे थर उभे केल्यावर त्या पटीत बक्षीस मिळते. आम्ही सात थर यशस्वी उभे करतो. यासाठी केलेली मेहनत वाया गेली.
अतुल तावरे- अध्यक्ष शिवछत्रपती दहीहंडी संघ
माळेगावात पहिली सार्वजनिक दहीहंडी स्थापनेचा मान आमचा आहे. याद्वारे युवकांचे संघटन केले. मात्र आता युवकांचे संघटन करणे अवघड बनले आहे.
पै.अमित गोंडे - कै.वस्ताद चिमाजीराव गोंडे तालिम व दहीहंडी संघ
दहीहंडी उत्सवाच्या तयारीसाठी महिनाभर आधी जय्यत तयारी करावी लागत होती. मात्र दहीहंडी उत्सव रद्द झाल्याने यंदा तयारी केली नाही.
किरण खोमणे- जय मल्हार दहीहंडी