'माठातल्या पाण्यानेच तहान भागते...' उन्हाचा तडाखा वाढताच माठ खरेदीसाठी ग्राहकांचा कल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2023 02:49 PM2023-03-01T14:49:35+5:302023-03-01T14:49:45+5:30
गरीबाचा फ्रीज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘माठा’ला शहरात व उपनगरांत मागणी वाढली
पुणे : उन्हाचा पारा हळूहळू चढण्यास सुरुवात झाली असता गरीबाचा फ्रीज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘माठा’ला शहरात व उपनगरांत मागणी वाढली आहे. पुणे शहरातील कुंभारवाडा येते अनेक वर्षांपासून माठ व्यावसायिक वर्षभर माठ घडवितात. कुंभारांनी बनविण्यात आलेल्या माठांना उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर मागणी असते. शहरात ठिकठिकाणी माठ विक्रीसाठी दुकाने थाटली असून, सध्या माठ खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढत आहे.
मात्र, बदलत्या काळानुसार थंडगार पाण्याच्या माठाची जागा मिनरल वॉटरने घेतली असली तरी पारंपरिक माठाच्या पाण्याची चव मात्र वेगळीच असते. त्यामुळे कुंभार व्यावसायिकांवर काही प्रमाणात परिणाम झाला तरी आजही माठातील पाणी शुद्ध आणि आरोग्याला फायदेशीर असल्याने अनेकांच्या घरात थंड पाण्यासाठी माठ अजून वापरला जातो.
शहरात व उपनगरांत अनेक ठिकाणी व्यासायिकांकडे निरनिराळ्या आकारातील माठ उपलब्ध आहे. यामध्ये लहान आकारापासून ते मोठ्या आकाराचा माठ, रांजण बाजारात उपलब्ध आहेत.
माठाचा भाव
-१२० रुपयांपासून सुरुवात असून, ४०० ते ५०० पर्यंत भावाने मिळत आहे.
तर मोठे रांजण ४०० ते ६०० रुपयांपर्यंत विक्री होत आहेत.
कल बदलला; पण विक्री कायम
गेल्या दोन ते तीन वर्षांपासून मिनरल वॉटर, जार आल्याने नागरिकांचा कल बदलला आहे. यात पाण्याचे पाऊच, थंड पाण्याच्या बाटल्या यांची भर पडल्याने कुंभार व्यवसायावर काही प्रमाणात परिणाम झाला आहे. विशेष म्हणजे फ्रिजच्या किमतीही वाढल्या आहेत. मार्केटमध्ये १५ ते ४० हजारांपर्यंत फ्रिज उपलब्ध असला तरीदेखील माठातील पाणी पिण्यासाठी नागरिकांचा कल तसाच आहे.
फ्रिजमधील पाण्याने तहान भागत नाही
वर्षानुवर्ष पारंपरिक माठ हा उन्हाळ्यात नेहमी घरी आम्ही वापरतो. फ्रिजमधील पाण्याने तहान भागत नाही. त्यामुळे माठातील पाणी पिल्यावरच पाणी पिल्यासारखे वाटते म्हणून उन्हाळ्यात माठाचा वापर नेहमी करीत आहे. - मालन वायदंडे, गृहिणी