तहान भागणार!
By admin | Published: April 14, 2016 02:10 AM2016-04-14T02:10:38+5:302016-04-14T02:10:38+5:30
धरणातून भीमा नदीपात्रात पिण्यासाठी पाणी सोडण्यास सुरुवात झाली असून, ‘धरण उशाशी, ग्रामस्थ उपाशी’ या शीर्षकाखाली ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीची दखल घेत पाटबंधारे विभागाने
चासकमान : धरणातून भीमा नदीपात्रात पिण्यासाठी पाणी सोडण्यास सुरुवात झाली असून, ‘धरण उशाशी, ग्रामस्थ उपाशी’ या शीर्षकाखाली ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीची दखल घेत पाटबंधारे विभागाने धरणातून डाव्या कालव्याद्वारे भीमा नदीपात्रात ५०० क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे. यंदा धरण जवळ असूनही भीमा नदीपात्र पहिल्यांदाच कोरडे पडले होते. यामुळे परिसरातील गावांच्या नळपाणी पुरवठा योजना जवळ जवळ बंद पडत आल्या होत्या. पिण्याच्या पाण्याच्या टंचाईमुळे परिसरातील महिलांना हातपंपांचा आधार घ्यावा लागत होता. नागरिकांबरोबरच जनावरांच्या पिण्याचा पाणीप्रश्न गंभीर झाला होता. ‘लोकमत’मध्ये शनिवार, दि. ९ रोजी पाणीटंचाईच्या गंभीर परिस्थितीची रोखठोख बातमी छायाचित्रासह प्रसिद्ध झाली होती. या बातमीची दखल घेत पाटबंधारे विभागाने भीमा नदीपात्रात पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे. राजगुरुनगरचा केदारेश्वर बंधारा भरेपर्यंत भीमा नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार आहे. या पाण्यामुळे परिसरातील गावांची व राजगुरुनगर शहराची किमान एक महिना पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर होण्यास मदत होणार आहे. पाणी सोडल्यामुळे तेथील नागरिकांनी ‘लोकमत’चे आभार मानले. (वार्ताहर)
चासकमान धरणात शिल्लक असलेला पाणीसाठा ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेली बातमी व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अतुल देशमुख यांनी पाणी सोडण्यासाठी केलेला पाठपुरावा, यामुळे भीमा नदीपात्रात पिण्यासाठी पाणी सोडल्याच्या भावना नागरिकांनी व्यक्त केल्या.
घोडेगाव : डिंभे धरण उजव्या कालव्याला दि. १३ रोजी सकाळी ८ वाजता पाणी सोडण्यात आले. खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर या कालव्याला पाणी आल्याने आंबेगाव व शिरूर या तालुक्यांतील शेतकऱ्यांना दिलासा मिळला आहे. मात्र, हे आवर्तन फक्त पिण्यासाठी सोडण्यात आले असून, शेतीपिकांना पाणी उचलू नये; अन्यथा गुन्हे दाखल करण्यात येतील, अशा नोटिसा डिंभे धरण पाटबंधारे विभागाने ठिकठिकाणी लावल्या आहेत. या कालव्याला पाणी यावे, अशी खूप मागणी होती. पाण्याअभावी पिके जळून गेली; मात्र आता सोडण्यात आलेले पाणी हे आंबेगाव व शिरूर या तालुक्यांतील टंचाईग्रस्त गावांना पिण्यासाठी सोडण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कालव्यावरून सायफन, वीजपंप, डिझेल पंपाद्वारे शेतीसाठी पाणी उचलू नये. कालव्याचा पाणी प्रवाह खंडित केल्यास किंवा कालव्यातून पाणी उचलल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, अशी नोटीस पाटबंधारे विभागाने प्रत्येक ग्रामपंचायतीला दिली आहे व गावागावांत चिकटवल्या आहेत. तसेच, कालव्यावर पोलीस, महसूल, वीजवितरण कंपनी, पाटबंधारे विभाग यांचे पाहणी पथक नेमण्यात आले आहे. हे पाहणी पथक रात्रीही फिरणार असून, पाणी न उचलू देण्याची काटेकोर अंमलबजावणी करणार आहे. तसेच वीजवितरण कंपनीला कालव्यावरील उपसा योजनांचा वीजपुरवठा खंडित करण्याच्या सूचना देणत आल्या आहेत. यामुळे कालव्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. दिवसातील काही तास तरी मोटारी चालू द्याव्यात अशी मागणी ते करीत आहेत. (वार्ताहर)
शेतीलाही पाणी द्या! डिंभे उजव्या कालव्यातून सोडलेले पाणी फक्त पिण्यासाठीच असल्याने कालव्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. दिवसातील काही तास तरी मोटारी चालू द्याव्यात, अशी मागणी ते करीत आहेत. मात्र, कालव्याला अनेक ठिकाणी गळती असल्यामुळे आपोआप पाणी विहिरी, तलाव, बंधारे यांमध्ये जात असून, त्याचा काही शेतकऱ्यांना होईल.